yuva MAharashtra काँग्रेसच्या अस्तित्वावर चिंतेची सावली; आ. सत्यजीत तांबे यांची सडेतोड भूमिका !

काँग्रेसच्या अस्तित्वावर चिंतेची सावली; आ. सत्यजीत तांबे यांची सडेतोड भूमिका !


| सांगली समाचार वृत्त |
नाशिक - दि. २४ मे २०२५

२०१४ मध्ये झालेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर देशात भाजपप्रणित सरकार सत्तेवर आले. त्यानंतर काँग्रेस पक्ष सातत्याने सत्तेपासून दूरच राहिला आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावलेला काँग्रेस पक्ष आज काही मोजक्या राज्यांपुरता सीमित झालेला दिसतो. दुसरीकडे, भाजपने अनेक राज्यांमध्ये आपली पकड मजबूत केली आहे. यामुळे काँग्रेस पक्ष नेतृत्वहीन आणि दिशाहीन वाटतो आहे. याबाबत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार तथा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आपली सडेतोड भूमिका मांडली आहे.

काँग्रेस पक्षाची आगामी वाटचाल कशी असेल, याबाबत सध्या कुठलाही निश्चित अंदाज बांधणे कठीण झाले आहे. परिणामी पक्षातील अनेक पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, एकीकडे काँग्रेसमधून बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढते आहे, तर दुसरीकडे भाजपमध्ये नव्याने सामील होणाऱ्यांची संख्या वाढताना दिसते.

सत्यजीत तांबे म्हणाले, "काँग्रेस हा एक विचार आहे आणि तो विचार कधीच संपणार नाही. देशासाठी तो आवश्यक आहे. मात्र, आज काँग्रेसमध्ये कोणी गांभीर्याने काम करताना दिसत नाही. पक्षाचे धोरण स्पष्ट नाही. काही वेळा देशाच्या विरोधात भूमिका घेताना दिसते, हे मनाला टोचते."


तांबे यांनी उघडपणे सांगितले की, भारत - पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळात शशी थरूर यांच्यासारख्या विद्वान नेत्याला सहभागी न करण्याचा निर्णय चुकीचा होता. "शशी थरूर सारख्या मतप्रवण, वैचारिक आधार असलेल्या नेत्यांना काँग्रेसमधील दिल्लीस्थित गट दुर्लक्षित करतो, हे पक्षासाठी नुकसानकारक ठरते," असे ते म्हणाले.

तांबे यांनी पुढे सांगितले की, "मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष निवडणुकीतून झालो. तीन निवडणुका लढलो. पक्षाने मला ओळख दिली, देशभर काम करण्याची संधी दिली, मित्रपरिवार दिला – ही गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही. पण आज पक्षातील योग्य लोक दुर्लक्षित होत आहेत. संघटनात्मक पातळीवर काहीच दिलं जात नाही, याचं दुःख आहे."

सत्यजीत तांबे यांच्या या वक्तव्यांमधून काँग्रेस पक्षातील अंतर्गत विसंवाद, नेतृत्वाचा अभाव आणि विचारधारेच्या दिशेचा गोंधळ अधोरेखित होतो. काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आता आली असल्याचं त्यांच्या मतांतून स्पष्ट होते.