| सांगली समाचार वृत्त |
लाहोर - दि. २९ मे २०२५
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एक गंभीर आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर याच्यावर या हल्ल्याचे सूत्रधार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा गौप्यस्फोट खुद्द पाकिस्तान लष्करात सेवेत असलेल्या माजी मेजर आदिल राजा यांनी केला आहे.
दहशतवादाला लष्कराची छुपी साथ?
मेजर आदिल राजा यांनी सांगितले की, असीम मुनीर याने भारतात अशांतता पसरवण्यासाठी आणि आपल्या पदाला खतपाणी घालण्यासाठी हा हल्ला आखून दिला होता. भारताकडून झालेल्या पराभवामुळे अस्वस्थ झालेल्या मुनीरने आपली छबी मजबूत करण्यासाठी आणि फील्ड मार्शल पद मिळवण्यासाठी ही योजना रचली. या कारवाईत पाकिस्तानी लष्कराचे आणखी 4-5 वरिष्ठ अधिकारी सहभागी होते, असेही आदिल राजा यांचे म्हणणे आहे.
ISI प्रमुख असीम मलिक आणि इतर अधिकाऱ्यांचा सहभाग
राजा यांनी आणखी खुलासा केला की, या हल्ल्यामध्ये आयएसआयचे प्रमुख असीम मलिक यांचाही थेट सहभाग होता. 30 सप्टेंबर 2024 रोजी आयएसआयचे महासंचालक झालेल्या मलिक यांच्यावर असीम मुनीरचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळेच त्यांना नुसते गुप्तचर संस्थेचे नेतृत्वच नाही तर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदही देण्यात आले.
व्हॉट्सॲपवरून दहशतवाद्यांना आदेश
या कटात स्पेशल ऑपरेशन्स डिव्हिजनचे प्रमुख मोहम्मद शहाब असलम यांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. हल्लेखोर दहशतवाद्यांशी थेट संपर्क साधणारा अधिकारी म्हणून असलमचे नाव पुढे आले आहे. तो व्हॉट्सॲपवरून दहशतवाद्यांना सूचना देत होता. पाकिस्तानचे नाव पुढे येऊ नये म्हणून, त्यांनी अफगाणिस्तान व मलेशियातील सिम कार्डांचा वापर केल्याची माहिती आदिल राजा यांनी दिली.