| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - दि. २९ मे २०२५
कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र जोतिबा मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे २५९ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि नियोजन मंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने या खर्चास आज प्रशासकीय मान्यता दिली आहे.
या महत्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी व देखरेख कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत असेल. हा निर्णय उपमुख्यमंत्र्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे फलित असून, मंदिर परिसराचा विकास व्यापक दृष्टिकोनातून करण्यात येणार आहे.
काय असणार या विकास आराखड्यात?
- या प्रकल्पांतर्गत पुढील कामांचा समावेश आहे:
- श्री जोतिबा व यमाई मंदिरांचे जतन व दुरुस्ती
- डोंगरावरील पायवाटा व कड्यांचे संरक्षण आणि सौंदर्यीकरण
- देवस्थान प्राधिकरणाचे नवीन कार्यालय उभारणे
- ज्योत स्तंभांची उभारणी (२ ठिकाणी)
- नवीन तळ्यांचा विकास व बागांची निर्मिती (केदार विजय गार्डन, यमाई परिसर - चाफेवन)
- कर्पूर, चव्हाण, मुरलीधर पुष्करणी तलावांचे संवर्धन
- ऐतिहासिक अंगारकर वाडा व बाब यांचे जतन
- पार्किंग, पाणपोई, स्वच्छतागृहे यांसारख्या मूलभूत सुविधा उभारणे
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ८१.६० कोटी रुपयांची कामे थेट नियोजन विभागामार्फत केली जाणार आहेत.
प्रकल्प पूर्ततेची अंतिम मुदत – मार्च २०२७
या सर्व कामांची अंमलबजावणी ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेवा कायम ठेवत, पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सर्व कामे पार पडणार आहेत. आवश्यक त्या पर्यावरणीय व पुरातत्त्वीय परवानग्या घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे.
यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती गठित करण्यात येणार असून, दोन्ही समित्यांचे नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांकडे राहील.