| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १५ मे २०२५
वाढत्या अपघातांमुळे चर्चेत आलेल्या शिवशाही वातानुकूलित बस सेवा अखेर बंद होणार असून, त्यांचे रूपांतर पुन्हा एकदा पारंपरिक एसटी सेवेत - म्हणजेच ‘हिरकणी’ किंवा ‘लालपरी’ बसमध्ये होणार आहे.
पूर्वी सुरू असलेली ‘एशियाड’ सेवा बंद करून शिवशाही बस चालू करण्यात आली होती. आता मात्र त्याच शिवशाही बस पुन्हा एशियाड रूपात प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहेत. या निर्णयामुळे एसटी महामंडळाचा मोठा आर्थिक भारही कमी होण्याची शक्यता आहे.
पहिल्या टप्प्यात १०० बसचे रूपांतर
प्रारंभी १०० शिवशाही बसमधून वातानुकूलन यंत्रणा काढून टाकण्यात येणार असून, आतील सजावट व बसचा रंगसंगत लूकही बदलण्यात येणार आहे. यामुळे तिकीट दरात काही प्रमाणात बदल होऊ शकतो. गंमतीशीर बाब म्हणजे या महत्त्वाच्या बदलाची माहिती खुद्द परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनाही नव्हती. त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “असा कोणताही प्रस्ताव अद्याप माझ्याकडे आलेला नाही. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय योग्य वाटत असेल, तर त्यावर विचार होऊ शकतो.”
शिवशाही सेवा का ठरली अपयशी?
सध्या एसटी महामंडळाकडे ७९० शिवशाही बस आहेत, परंतु त्यातील फक्त निम्म्याच सेवा सुरू आहेत. उर्वरित बस विविध तांत्रिक बिघाडांमुळे कार्यशाळांमध्ये उभ्या आहेत. सुरुवातीपासूनच या बस तांत्रिक अडचणी, अपघात, वातानुकूलन बिघाड, कमी वेग, वाजणाऱ्या आवाजांमुळे प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत होत्या. परिणामी, या सेवेवर लोकांचा विश्वास बसला नाही.
2017 मध्ये झाली होती शिवशाहीची सुरुवात
तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या काळात मुंबई-रत्नागिरी मार्गावर शिवशाही बस सुरू करण्यात आली होती. उद्देश होता - सामान्य प्रवाशांना स्वस्तात आरामदायी वातानुकूलित सेवा पुरवणे. मात्र बस भाडे तत्वावर घेतल्या गेल्याने आणि काही खाजगी चालकांच्या हलगर्जीपणामुळे ही सेवा अनेक समस्यांना सामोरी गेली. काही चालक मद्यप्राशन करून बस चालवत असल्याच्या तक्रारीही पुढे आल्या.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शिवशाही सेवा इतिहास जमा होत असून, त्या बस नव्या जोमात, नव्या रंगरूपात ‘हिरकणी’ किंवा ‘लालपरी’ म्हणून रस्त्यावर धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना पुन्हा एकदा विश्वासार्ह आणि सोपी एसटी सेवा मिळण्याची शक्यता आहे.