| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ मे २०२५
सुमारे 3.5 कोटी रुपये किमतीच्या सुमारे साडेतीन किलो सोन्याची तस्करी प्रकरणी सांगली शहरातील टिळक चौक परिसरातील सराफ व्यावसायिक दीपक सगरे याला महसूल गुप्तचर संचालनालय (DGGI) च्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्याला जिल्हा न्यायालयाने 48 तासांसाठी ट्रान्झिट कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून, पुढील तपासासाठी त्याला नागपूर येथे हलवण्यात आले आहे.
ही कारवाई 2024 मध्ये नागपूरमध्ये उघडकीस आलेल्या एका मोठ्या सोन्याच्या तस्करीप्रकरणाशी संबंधित आहे. प्राथमिक तपासात सांगली जिल्ह्यातील विटा भागातील दोन व्यक्तींचा सहभाग उघड झाला होता. या दोघांपैकी एका व्यक्तीकडून सांगलीतील सराफ व्यावसायिकाने साडेतीन किलो सोने स्वीकारल्याचे पुरावे तपास यंत्रणेला मिळाले आहेत.
शुक्रवारी DGGI च्या मुंबई, नागपूर आणि पुणे शाखांच्या संयुक्त पथकाने टिळक चौकातील दीपक सगरे यांच्या दुकानावर छापा टाकून छाननी केली. या दरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. सगरे यास अटक केल्यानंतर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले आणि न्यायालयाने त्याला दोन दिवसांची ट्रान्झिट कोठडी सुनावली. आता त्याच्याविरुद्धची सखोल चौकशी नागपूर येथील कार्यालयात सुरू आहे.