| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ मे २०२५
आगामी पावसाळा आणि पूरपरिस्थितींचा संभाव्य धोका लक्षात घेता, शासनाने राज्यभरातील रेशन दुकानदारांना पुढील तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी उचलून लाभार्थ्यांना वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी संबंधित विभाग व रेशन दुकान संघटनांच्या अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन दिशा-निर्देश दिले गेले.
या आदेशानंतर तातडीने तीन महिन्यांचे धान्य वाटप सुरू झाले असले तरी, आता इतक्या मोठ्या प्रमाणात धान्य साठवण्यासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बहुतांश रेशन दुकानदारांकडे इतके धान्य ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नाही. याचप्रमाणे प्रशासनाकडे असलेली गोदामेही पुरेशी नसल्यामुळे साठवणुकीचे मोठे आव्हान समोर उभे ठाकले आहे.
केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत ही विशेष योजना राबवली असून, सांगली जिल्ह्यातील 30,598 अंत्योदय रेशन कार्डधारकांना दरमहा 15 किलो गहू आणि 20 किलो तांदूळ मोफत मिळतो. तसेच, 3,99,905 प्राधान्य कुटुंब योजना धारकांना प्रत्येकी 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ देण्यात येतो. एकूण 4,30,503 कार्डधारकांपर्यंत मोफत धान्य पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
पाच वर्षांपूर्वी कोरोनाच्या काळात अशाच प्रकारे तीन महिन्यांचे धान्य एकत्र देण्यात आले होते. मात्र त्या वेळी देखील साठवणुकीसंबंधी अडचणी निर्माण झाल्या होत्या. शहरांमध्ये मिरज रेल्वे गोदामातून थेट दुकानदारांकडे धान्य पाठवले जाते. परंतु ग्रामीण भागात तालुक्याच्या गोदामांतून वितरण होते. सद्य परिस्थितीत ही गोदामे देखील तीन महिन्यांच्या साठ्याला अपुरी ठरत आहेत. त्यामुळे रेशन दुकानदारांकडून धान्य टप्प्याटप्प्याने वितरित करण्याची मागणी करण्यात येत आहे.
दीपक उपाध्ये, अध्यक्ष - रेशन धान्य दुकान संघटना, सांगली जिल्हा यांनी स्पष्ट केले की, "आमच्याकडे एकाचवेळी इतके धान्य साठवण्याची सुविधा नाही. त्यामुळे प्रत्येक महिन्यानंतर पुढील महिन्याचे धान्य तात्काळ मिळावे, यासाठी शासनाने योग्य उपाययोजना कराव्यात."