yuva MAharashtra एसटी बससेवा होणार ‘स्मार्ट’ – प्रवाशांसाठी सुरक्षित आणि सुसज्ज प्रवासाची नवी दिशा

एसटी बससेवा होणार ‘स्मार्ट’ – प्रवाशांसाठी सुरक्षित आणि सुसज्ज प्रवासाची नवी दिशा


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ मे २०२५

एसटी प्रवाशांना आता अधिक सुरक्षित, वेळेवर आणि आरामदायी प्रवास अनुभवता यावा यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज ‘स्मार्ट बस’ लवकरच सेवेत दाखल होणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

नवीन तीन हजार बस खरेदीसंदर्भात आयोजित केलेल्या बस उत्पादक कंपन्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर तसेच विविध विभागप्रमुख व बस उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य

या नव्या बसेसमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे, जीपीएस, वाय-फाय, एलईडी टीव्ही, चोरीविरोधी लॉक सिस्टीम आदी अत्याधुनिक सुविधा असणार आहेत. यामुळे बसप्रवास अधिक सुरक्षित, सुसंगत व प्रवाशांसाठी आरामदायी ठरेल.

स्वारगेट बसस्थानकावर घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कडक करण्यात येणार असून, सीसीटीव्ही कॅमेरे बसमध्ये बसवून प्रवासदरम्यान घडणाऱ्या घटनांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. चालकाच्या वाहनचालना पद्धतीवर देखील या कॅमेऱ्याद्वारे सतत देखरेख ठेवली जाणार आहे.



एलईडी टीव्हीवरून माहितीचा वेगवान प्रसार

प्रत्येक बसमध्ये एलईडी टीव्ही बसवून प्रवाशांना महत्त्वाच्या बातम्या, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांचे संदेश, तसेच सार्वजनिक हिताच्या सूचना दाखवण्याची व्यवस्था असेल. शिवाय, बसच्या बाहेरही एलईडी पॅनलद्वारे जाहिराती दाखवण्यात येणार असून, त्यातून महामंडळाला अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे.

आग प्रतिबंधक यंत्रणा: प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नवे पाऊल

उष्णतेमुळे बसमध्ये लागणाऱ्या आगीच्या घटनांना रोखण्यासाठी फोम बेस्ड अग्निशमन प्रणाली बसवण्यात येणार आहे. आग लागण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी तात्काळ फोम फवारून आग विझवण्याची क्षमता या यंत्रणेत असेल.

‘स्मार्ट’ बसमुळे अनेक फायदे

या उपक्रमामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल, प्रवासाची शिस्त राखली जाईल, वेळेवर फेऱ्या होतील आणि प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होईल. यामुळे ‘एसटी’ खऱ्या अर्थाने स्मार्ट होण्याच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.