| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ मे २०२५
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेला दीनदयाळ उपाध्याय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत महापालिकेला 9 ई रिक्षा घंटागाड्या प्राप्त झाल्या असून आयुक्त सत्यम गांधी आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या मार्गदर्शनानुसार, तसेच उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नियोजनाखाली या 9 रिक्षा घंटागाड्या महिला बचत गटातील महिला चालवणार आहेत.
महाराष्ट्रात फक्त 5 महानगरपालिकांना केंद्राच्या योजनेतून या ई रिक्षा घंटागाड्या देण्यात आल्या असून यात सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचाही समावेश आहे. आज या इ रिक्षा घंटागाडीची पाहणी उपायुक्त स्मृती पाटील आणि सर्वच लाभार्थी बचत गटातील महिला चालक यांनी केली. तसेच सर्व महिला चालकांना या ई रिक्षा घंटागाडीची माहिती ही देण्यात आली. उपायुक्त स्मृती पाटील आणि मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या उपस्थितीत आजपासून या महिला चालकांचं प्रशिक्षण सुरू करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियानाच्या व्यवस्थापिका ज्योती सरवदे, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत मद्रासी, शहरस्तरीय संघांचे अध्यक्षा पुष्पा सोनवळे, कुपवाडच्या अध्यक्षा कविता पवार, नितीन डोंबाळे उपस्थित होते. या 9 रिक्षा घंटागाड्यांवर सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील बचत गटातील 9 महिला आणि 9 सहाय्यक कार्यरत राहणार आहेत. या महिला चालक आणि सहाय्यक यांना महापालिकेकडून मानधन देण्यात येणार आहे.
या 9 रिक्षा घंटागाड्या संध्याकाळी कार्यरत राहणार असून तिन्ही शहरातील खाऊ गल्ल्या आणि काही व्यवसायिक ठिकाणी जाऊन कचरा संकलन करणार आहेत. महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आता बचत गटातील महिला आत रिक्षा घंटागाड्या चालवणार आहेत.