yuva MAharashtra पलूसमध्ये काँग्रेसची सत्ता टिकणार की राष्ट्रवादी-भाजप आघाडी मुसंडी मारणार ?

पलूसमध्ये काँग्रेसची सत्ता टिकणार की राष्ट्रवादी-भाजप आघाडी मुसंडी मारणार ?


| सांगली समाचार वृत्त |
पलूस - दि. १५ मे २०२५ 

पलूस-कडेगाव विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच पक्षांचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लागले आहे. नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतींसह सर्व ठिकाणी निवडणुकीचे वारे पुन्हा जोर धरू लागले आहेत.

या पार्श्वभूमीवर पलूसमध्ये काँग्रेस आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी नियोजनाला सुरुवात केली असून, भाजपचे संग्राम देशमुख देखील जोमात उतरले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) देखील मैदानात आल्यामुळे राजकीय रंगत वाढली आहे. त्यामुळे यावेळी कोण बाजी मारणार, याची उत्सुकता वाढली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने पुढील चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यामुळे राजकीय हालचालींना गती मिळाली आहे. प्रशासनालाही आता प्रभाग रचना आणि आरक्षण ठरवण्याचे काम सुरू करावे लागणार आहे. पलूस नगरपालिकेत गेली साडेतीन वर्षे प्रशासक कार्यरत आहे. 2021 मध्ये पालिकेची मुदत संपल्यापासून विविध पक्ष निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहेत.

बदललेलं राजकीय गणित

16 नोव्हेंबर 2016 रोजी झालेल्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसने 17 पैकी 12 जागा जिंकून नगराध्यक्ष पदासह सत्ता हस्तगत केली होती. स्वाभिमानी विकास आघाडीला 4 आणि भाजपला 1 जागा मिळाली होती. राष्ट्रवादीला मात्र खाते उघडता आले नव्हते. आता 2021 मध्ये निवडणूक होण्याऐवजी ती लांबली आणि राजकीय तापमान काही काळासाठी थंडावले. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुन्हा एकदा सर्व पक्ष सक्रिय झाले आहेत.


विश्वजीत कदम यांच्या पाठिशी मोठा आधार

आमदार डॉ. विश्वजीत कदम यांचे पलूस हे होम ग्राउंड असल्याने ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. त्यांच्या सोबत गणपतराव पुदाले, वैभव पुदाले, सुहास पुदाले, विशाल दळवी, गिरीश गोंदील, विक्रम पाटील यांचा सक्रीय पाठिंबा आहे. विशेष म्हणजे कधी काळी भाजपसोबत असणारा दिवंगत अमरसिंह इनामदार यांचा गट सध्या काँग्रेससोबत आहे. शिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अरुण लाड देखील विश्वजीत कदम यांना साथ देण्याची शक्यता आहे.

विरोधकांची एकजूट काँग्रेससाठी अडचण ?

गेल्या निवडणुकीत विरोधी पक्ष विभाजित होते, त्यामुळे काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले. पण यंदा परिस्थिती वेगळी आहे. स्वाभिमानीचे निलेश येसुगडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेशले आहेत. त्यामुळे त्यांना आता पक्षसंघटनेचा आधार लाभणार आहे. भाजपमध्ये गेलेले सर्जेराव नलवडे यांचीही भूमिका महत्वाची ठरणार आहे. महायुती एकत्र आली, तर काँग्रेससाठी लढत कठीण होऊ शकते.

सत्ता राखण्याचं आव्हान

गेल्या निवडणुकीत काँग्रेसने पतंगराव कदम, वसंतराव पुदाले, खाशाबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला होता. आता ही लढत त्यांची पुढची पिढी लढवत आहे. डॉ. विश्वजीत कदम यांच्यासाठी ही निवडणूक सत्ता टिकवण्याची कसोटी ठरणार आहे. विरोधक एकवटले, तर काँग्रेसला चुरशीची लढत द्यावी लागेल. मात्र विरोधक वेगवेगळे लढले, तर काँग्रेसला पुन्हा एकदा संधी मिळू शकते.