| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २४ मे २०२५
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका खास मुलाखतीत असे विधान केले की, महाराष्ट्रात "ठाकरे" आणि "पवार" या दोन आडनावांच्या राजकीय प्रभावाला संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर या प्रयत्नांचा आरोप केला.
ठाकरे आणि पवार – महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची नावंएका टीव्ही कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. या पार्श्वभूमीवर ‘ठाकरे’ आणि ‘पवार’ या ब्रँडना संपवण्याचा प्रयत्न काही शक्तींनी सुरू केला आहे. पण हे ब्रँड संपवले जाणार नाहीत, याबाबत मी पूर्ण विश्वासाने सांगतो."
ठाकरे घराण्याचा वारसा आणि प्रभाव
राज ठाकरे यांनी आपल्या कुटुंबाचा महाराष्ट्रावर झालेला प्रभाव सांगताना पुढे म्हटले की, "माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी समाजजागृती केली. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. संगीत आणि इतर क्षेत्रात वडील श्रीकांत ठाकरे यांचं योगदान होतं. आता मी, उद्धव ठाकरे आम्ही दोघेही पुढे आलो आहोत. या सर्व बाबी वैयक्तिक असल्या, तरी शेवटी 'ठाकरे' हे आडनावच ओळख बनलं आहे. आणि हेच नाव संपवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत."
हिंदी सक्तीवर मनसेचा विरोध कायम
या कार्यक्रमात हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरही राज ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणांतर्गत हिंदीला प्राधान्य देण्याच्या निर्णयाला त्यांनी तीव्र विरोध दर्शवला.
"हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, जशी मराठी ही राज्याची राजभाषा आहे आणि इंग्रजी ही जागतिक भाषा मानली जाते, त्याचप्रमाणे ज्याला हवंय त्यानेच हिंदी शिकावी. मी याला विरोध करतच राहणार आहे आणि इतर भाषांच्या पुस्तकांचाही शाळांमध्ये प्रसार होऊ देणार नाही," असे त्यांनी ठामपणे सांगितले.