| सांगली समाचार वृत्त |
मॉस्को/नवी दिल्ली - दि. २४ मे २०२५
पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायांचे पुरावे सादर करण्यासाठी रशियात गेलेल्या भारतीय शिष्टमंडळाला विमानतळावर अनपेक्षित प्रसंगाला सामोरे जावे लागले. द्रमुक खासदार कनिमोझी यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाचे विमान मॉस्कोमध्ये उतरण्याच्या तयारीत असताना अचानक ड्रोन हल्ला झाला. यामुळे राजधानी मॉस्कोमधील सर्व विमानतळांवर काही काळासाठी विमान वाहतूक थांबवण्यात आली. परिणामी, भारतीय विमानाला हवेत काही वेळ प्रदक्षिणा घालावी लागली. काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर विमान सुखरूपरीत्या उतरण्यात आले.
भारतीय राजदूतांचे स्वागत, शिष्टमंडळाचे उद्दिष्ट स्पष्टमॉस्कोमध्ये पोहोचल्यावर भारतीय राजदूत विनय कुमार यांनी सर्व खासदारांचे औपचारिक स्वागत केले. या दौऱ्याचा मुख्य उद्देश रशियन अधिकाऱ्यांना पाकिस्तानमध्ये वाढणाऱ्या दहशतवादी हालचालींबाबत माहिती देणे हा आहे. कनिमोझी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, “भारत आणि रशियामध्ये आधीपासूनच मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पाकिस्तानमधील दहशतवादी कसे आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका ठरत आहेत, हे आम्ही रशियन अधिकाऱ्यांना सविस्तरपणे सांगणार आहोत.”
पुतिन यांची चिंता व्यक्त
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अलीकडेच डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधताना अशी चिंता व्यक्त केली होती की, जेव्हा जेव्हा परदेशी अधिकृत मंडळी रशियाचा दौरा करतात, तेव्हा युक्रेन मुद्दाम ड्रोन हल्ले घडवतो. यामागे रशियाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अलग ठेवण्याचा हेतू असल्याचा त्यांचा आरोप आहे.
युक्रेनकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया नाही
या घटनेनंतर युक्रेनकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. ‘द कीव इंडिपेंडेंट’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २२ मे रोजी रशियाने तब्बल २५० हून अधिक युक्रेनियन ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर रशियाने तीन प्रमुख विमानतळ तात्पुरते बंद केले आहेत.