| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ मे २०२५
भाजपने विधानसभा निवडणुकीत उल्लेखनीय कामगिरी बजावली असून, आता पक्ष कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज राहावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका प्रथम टप्प्यात घेतल्या जातील. त्यानंतर अवघ्या १५ दिवसांत महापालिका निवडणुका पार पडणार असल्याचे सांगून कार्यकर्त्यांना रिचार्ज केले.
सांगलीत आयोजित भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात फडणवीस बोलत होते. या बैठकीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, भगवान साळुंखे, संघटनमंत्री मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहराध्यक्ष प्रकाश ढंग, पृथ्वीराज पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, दीपक शिंदे, नीता केळकर आदी नेते उपस्थित होते.
फडणवीस यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर कार्यकर्त्यांनी उणिवा ओळखून विधानसभा निवडणुकीसाठी तयारी केली. त्याचे फलित म्हणजे महायुतीची यशस्वी सत्ता. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महत्त्वाच्या असून त्या जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने उतरावे. निवडणुका जिंकल्यानंतर निधीच्या कमतरतेचा प्रश्न येऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
फडणवीस यांनी "मी पुन्हा येईन" म्हणताच सभागृहात हास्याचे वातावरण
"मी पुन्हा येईन, आणि त्यावेळी कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधेन. सांगलीला पुन्हा येण्याची मला सवयच आहे," असे फडणवीस म्हणाले आणि उपस्थितांमध्ये हास्याची लाट उसळली. टाळ्यांच्या गजरात त्यांनी आपली उपस्थिती पुन्हा नोंदवण्याचे आश्वासन दिले.
"दादांनी तंत्र वापरलं" -
फडणवीस यांचा विनोदी उल्लेख
दिल्लीतील बैठकीस जाण्याची गरज असल्याने, चंद्रकांत पाटील यांना मेळाव्याच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली. त्यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री या नात्याने चपखल कौशल्य दाखवत मला वेळेवर पाठवले, अशी मिश्किल टिप्पणी फडणवीस यांनी केली. यावर चंद्रकांत पाटील यांनीही हास्याने प्रतिसाद दिला.
----------------------------------
गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलिसांनी सतर्क
मुख्यमंत्र्यांचे आवाहन !
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सक्षम राखण्यासाठी पोलिस यंत्रणेने अधिक सजग राहावे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. न्यायालयीन खटल्यांमध्ये आरोपी निर्दोष सुटू नयेत, यासाठी पोलिसांनी आवश्यक दक्षता घ्यावी, असे ते म्हणाले.
सांगलीतील पोलिस मुख्यालयात झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी राज्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा, कोल्हापूर परिक्षेत्राचे प्रभारी अधिकारी डॉ. शशिकांत माहुरकर, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, न्यायालयात आरोपी निर्दोष सुटण्याचे प्रमाण जास्त असलेल्या पोलिस ठाण्यांचा सखोल आढावा घ्यावा. त्यामागील कारणांची शोधमोहीम राबवून उणिवा दूर कराव्यात. सरकारी वकिलांसोबत समन्वय बैठक घेवून ई-समन्स प्रणालीचा प्रभावी वापर करावा, ज्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाचतील. दोष सिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी सर्वतोपरी उपाय करावेत, अशी सूचनाही त्यांनी दिली.
मालमत्ताविषयक गुन्ह्यांमधून हस्तगत केलेल्या वस्तू परत करण्याचे प्रमाण वाढवावे, तर अमली पदार्थविरोधी कारवाई करताना बंद असलेल्या रासायनिक कारखान्यांची तपासणी करावी, असे त्यांनी सांगितले. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने निवडणूक काळात चांगली कामगिरी बजावल्याबद्दल पोलिस दलाचे कौतुक करताना, मुख्यमंत्री फडणवीस यांनी बेपत्ता महिलांशी संबंधित गुन्ह्यांवर विशेष लक्ष देण्याचेही निर्देश दिले. या संदर्भात पोलिस ठाणेनिहाय ट्रॅकिंग करणे आणि विशेष मोहिमा राबवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्ह्यांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरज त्यांनी मांडली. तसेच, आरोपी अनुपस्थित असतानाही खटले चालवण्याची व्यवस्था करावी, दोषारोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण वाढवावे, आणि नव्या फौजदारी कायद्यातील पुरावा स्वीकारण्याच्या नियमांचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. झिरो एफआयआरला नियमित एफआयआरमध्ये रूपांतर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
या बैठकीत पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील पोलिस दलाच्या कामगिरीचे सादरीकरण केले. यामध्ये पोलिस दलाच्या यशस्वी उपक्रमांची, कल्याणकारी योजनांची आणि भविष्यातील आव्हानांची माहिती दिली. बैठकीस उपविभागीय अधिकारी, पोलिस निरीक्षक आणि अन्य अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.