yuva MAharashtra भारताने पाकड्यापाठोपाठ चिन्यांचे नाक ठेचले !

भारताने पाकड्यापाठोपाठ चिन्यांचे नाक ठेचले !


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली- दि. १५ मे २०२५

पाकिस्ताननंतर भारताने आता चीनविरोधात ठोस पावले उचलली आहेत. चीनचे सरकारी मुखपत्र समजले जाणारे ग्लोबल टाईम्स याचे X (पूर्वीचे ट्विटर) वरील अधिकृत खाते भारत सरकारने बंद केले आहे. या माध्यमातून भारताविरोधात सातत्याने खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात होती. या पार्श्वभूमीवर कारवाई करत भारताने या अकाउंटला ब्लॉक केले आहे.

ग्लोबल टाईम्स हे चीन सरकारचे विचार पुढे नेणारे प्रमुख माध्यम असून, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे धोरण जगभर पोहोचवण्याचे काम करते. परंतु या माध्यमातून अरुणाचल प्रदेशासारख्या संवेदनशील विषयांवर खोट्या बातम्या प्रसारित केल्या जात होत्या. याचदरम्यान, भारताने चीनच्या या प्रोपगंडाविरोधात ठाम भूमिका मांडली आहे. चीनने अरुणाचलमधील काही भागांची नावे बदलण्याचा केलेला प्रयत्न फेटाळून लावत, भारताने स्पष्ट केले की, अरुणाचल प्रदेश हा देशाचा अविभाज्य भाग होता, आहे आणि कायम राहील.

पाकिस्तानवर आधीच घेतली होती कारवाई

चीनच्या आधी भारताने पाकिस्तानलाही खड्यासारखे उत्तर दिले होते. २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पाकिस्तान आणि पीओकेतील 9 ठिकाणी लक्ष्य करून भारतीय सुरक्षादलांनी मोठी कारवाई केली, ज्यामध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला.

या प्रचंड कारवाईनंतर पाकिस्तानने घाबरून अमेरिका मार्फत युद्धबंदीची मागणी केली. दोन्ही देशांच्या लष्करी प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेनंतर शांतता राखण्यावर सहमती झाली.


मोदींच्या दौऱ्यावरून चीनचा आक्षेप फोल ठरवला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील अरुणाचल दौऱ्यावर चीनने जोरदार आक्षेप नोंदवला होता. यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर देत सांगितले की, अरुणाचल प्रदेश भारताचे पूर्ण अधिकारातील राज्य असून, देशाचे नेते इतर राज्यांप्रमाणेच तेथेही दौरे करतात. त्यामुळे चीनचा आक्षेप निरर्थक आहे.

तुर्कस्तानलाही भारताचा दणका

दरम्यान, पाकिस्तानला पाठीशी घालणाऱ्या तुर्कस्तानशी झालेली सुमारे 1500 कोटींची महत्त्वाची डील पुण्यात रद्द करण्यात आली. यामागे भारतातील जनतेचा आणि प्रशासनाचा संयुक्त आक्रोश होता.