yuva MAharashtra सीमावर्ती भाग सील, लढाऊ विमानांची गस्त सुरू; संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभर हाय अलर्ट !

सीमावर्ती भाग सील, लढाऊ विमानांची गस्त सुरू; संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभर हाय अलर्ट !


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ९ मे २०२५

पाकिस्तान आणि पीओकेमध्ये भारतीय वायुदलाच्या कारवाईनंतर देशाच्या सीमेलगतच्या राज्यांमध्ये अत्यंत दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थान व पंजाब राज्यांमध्ये सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून, पोलिसांच्या सर्व रजा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी लागू करण्यात आली आहे, असे एनडीटीव्हीच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

राजस्थानची सुमारे १०३७ किलोमीटर लांब सीमा पाकिस्तानला लागून असल्याने येथे सतर्कतेचा विशेष आदेश देण्यात आला आहे. सीमारेषा पूर्णतः बंद करण्यात आली असून, कोणतीही संशयास्पद हालचाल दिसून आल्यास सुरक्षा दलांना ‘शूट अ‍ॅट साईट’ म्हणजेच जागेवरच कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

भारतीय हवाई दलाचीही तयारी पूर्ण असून, पश्चिम भारताच्या आकाशात सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमाने सातत्याने गस्त घालत आहेत. यामुळे जोधपूर, किशनगढ व बिकानेर येथील विमानतळ ८ मेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणाही सक्रिय करण्यात आली आहे.


गंगानगरपासून कच्छच्या रणापर्यंत लढाऊ विमाने गस्त घालत आहेत. बिकानेर, श्रीगंगानगर, जैसलमेर व बारमेर जिल्ह्यांमध्ये शाळा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या असून, परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पोलिस व रेल्वे कर्मचाऱ्यांच्या रजाही रद्द करण्यात आल्या आहेत. या सीमावर्ती गावांमध्ये रहिवाशांचे आपत्कालीन स्थलांतर शक्य होईल यासाठी तयारी करण्यात आली आहे. ड्रोनविरोधी उपकरणंही सक्रिय आहेत.

जैसलमेर व जोधपूर भागांत मध्यरात्रीपासून पहाटे ४ वाजेपर्यंत ब्लॅकआउटचा आदेश लागू आहे. अंधाराच्या संरक्षणामुळे शत्रूच्या हवाई कारवायांमध्ये अडथळा निर्माण होतो.

पंजाबमध्येही सर्व पोलिस कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून, सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. वाढत्या तणावामुळे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपल्या सर्व सरकारी कार्यक्रमांना स्थगिती दिली आहे.