yuva MAharashtra "पूर्वी आम्हाला दगड मारणारेच आज भाजपमध्ये!" — नितीन गडकरींच्या वक्तव्याची जोरदार चर्चा !

"पूर्वी आम्हाला दगड मारणारेच आज भाजपमध्ये!" — नितीन गडकरींच्या वक्तव्याची जोरदार चर्चा !

फोटो सौजन्य - Wikimedia

| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - दि. १२ मे २०२५

भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्ट बोलण्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. नागपूरमध्ये झालेल्या एका श्रद्धांजली सभेत त्यांनी व्यक्त केलेले विधान सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.

गडकरींच्या भाषणातील ठळक मुद्दा काय होता?

"काळ बदलतो आणि लोकही बदलतात," असं सांगताना गडकरींनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील सुरुवातीच्या काळातील एक प्रसंग उपस्थितांसमोर ठेवला. ते म्हणाले, "1975 च्या सुमारास आम्ही भाजपसाठी काम करत होतो. त्यावेळी आमच्या घरावर आणि संघाच्या कार्यालयावर दगडफेक करणारे अनेकजण होते. पण आता तेच लोक पक्षात सामील झालेत. त्यापैकी एक तर भाजपचा वार्ड अध्यक्षही झाला आहे. परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. पूर्वी टीका करणारे, शिवीगाळ करणारे आणि दगड मारणारे आता आमचेच झालेत."


ही भावना त्यांनी डॉ. रामदास आंबटकर यांच्या श्रद्धांजली सभेत व्यक्त केली. हे आयोजन नागपूरच्या मुंडले इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये करण्यात आले होते. या वेळी मंचावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, तसेच संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांचीही उपस्थिती होती.

गडकरी पुढे म्हणाले, "भाजपचे चांगले दिवस आज आले असतील, पण हे यश त्याग, संघर्ष आणि जिद्द दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांमुळेच शक्य झालं आहे. डॉ. आंबटकर यांसारख्या लोकांनी कठीण काळात काम केलं म्हणून आजचा हा काळ अनुभवता येतो आहे."