| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १२ मे २०२५
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ या विशेष मोहिमेची सुरुवात केली. या कारवाईत भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले करत जबरदस्त प्रत्युत्तर दिले.
या हल्ल्यात काही महिलांच्या पतींची त्यांच्यासमोर निर्घृण हत्या करण्यात आली होती. या अमानवी कृत्याला उत्तर देण्यासाठी भारताने कोणतीही संकोच न ठेवता कठोर पाऊल उचलले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव दिले असून, हे अभियान न्याय मिळवून देण्यासाठीचे ठोस पाऊल असल्याचे सांगण्यात आले आहे.
भारतीय हवाई दलाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ऑपरेशन सिंदूर संदर्भात माहिती देत स्पष्ट केले की, "ही मोहीम अद्याप सुरू असून, वेळ येताच अधिक माहिती देण्यात येईल. कृपया अफवांना बळी पडू नये. भारतीय हवाई दलाने दिलेली जबाबदारी अचूकपणे पार पाडली आहे."
दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमध्ये सीमावर्ती भागात हल्ले-प्रतिहल्ल्याची मालिका सुरू असताना अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करत युद्धबंदीची घोषणा केली. त्यांच्या घोषणेनंतर दोन्ही देशांत तात्पुरती शांतता प्रस्थापित झाली होती. मात्र, पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार सुरू केला आहे.
या पार्श्वभूमीवर भारताने आपली पूर्वीची ठाम भूमिका पुन्हा अधोरेखित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले की, "भारताने दहशतवादाविरोधात कधीही तडजोड केली नाही आणि पुढेही करणार नाही."