yuva MAharashtra देशातील सर्वात उंच शिवाजी महाराज पुतळ्याचे मालवणमध्ये भव्य लोकार्पण !

देशातील सर्वात उंच शिवाजी महाराज पुतळ्याचे मालवणमध्ये भव्य लोकार्पण !

फोटो सौजन्य  - दै. ललकार 

| सांगली समाचार वृत्त |
मालवण - दि. १२ मे २०२५

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन भव्य पुतळा उभारण्यात आला असून, आज त्याचे औपचारिक लोकार्पण, दर्शन व पूजन सोहळा उत्साहात पार पडला. काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी उभा करण्यात आलेला पुतळा तांत्रिक कारणांमुळे कोसळला होता, त्यानंतर शिवप्रेमींत नाराजीची लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने नव्याने भव्य शिवप्रतिमा उभारण्याचं आश्वासन दिलं होतं, ज्याची साक्ष वास्तवात उतरली.

या नव्या पुतळ्याची रचना विख्यात शिल्पकार राम सुतार यांनी केली असून, सुमारे ९१ फूट उंचीचा हा पुतळा आहे. त्यातील १० फूट हा बेस म्हणजे पेरेस्टल असून, मजबूत रचना, हवामान प्रतिकारशक्ती व अभूतपूर्व सौंदर्यामुळे तो देशातील सर्वात उंच शिवप्रतिमा ठरतो. या प्रकल्पासाठी तांत्रिक तज्ञ, आर्ट स्कूलचे प्रमुख व आयटी अभियंते एकत्र येऊन काम करत होते. 'तौक्ते'सारख्या वादळांचा अभ्यास करून हा पुतळा त्यापेक्षाही कठीण हवामान झेलू शकेल, अशा पद्धतीने उभा करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडला. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "घटनेनंतर त्वरित निर्णय घेतला आणि विक्रमी वेळेत हा पुतळा पुन्हा उभा केला. शासकीय यंत्रणांनी, विशेषतः सार्वजनिक बांधकाम विभागाने, अतिशय उत्कृष्ट व वेगवान कामगिरी बजावली."

या पुतळ्याचं देखभाल दहा वर्षांसाठी मूळ शिल्पकारांच्या जबाबदारीवर सोपवण्यात आली आहे. परिसराचे सौंदर्यीकरणही अंतिम टप्प्यात असून, भावी काळात हे स्थान शिवराज्याची अनुभूती देणारे आकर्षणकेंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "हा पुतळा केवळ धातूचा शिल्पकृती नसून, तो महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांसाठी प्रेरणास्थान व अभिमानाचं प्रतीक आहे. पर्यटनाच्या दृष्टीने कोकणाला पुढे नेण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचं पाऊल ठरेल."

या लोकार्पणाने महाराष्ट्रातील शिवप्रेमींसाठी अभिमानाचा क्षण घडवला असून, हे स्मारक पुढील अनेक दशकांपर्यंत स्वराज्याच्या प्रेरणेला साक्षी राहील.