yuva MAharashtra ऑपरेशन सिंदूर थांबणार नाही! पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला ठणकावलेला इशारा – गोळी आली तर तोफगोळ्याने उत्तर !

ऑपरेशन सिंदूर थांबणार नाही! पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला ठणकावलेला इशारा – गोळी आली तर तोफगोळ्याने उत्तर !


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १२ मे २०२५

पाकिस्तानकडून गोळी झाडली गेल्यास भारतातून थेट तोफगोळे डागले जातील, असा ठाम इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला आहे. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच असून, ते थांबणार नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे ही शस्त्रसंधी भारताने कोणत्याही मध्यस्थीशिवाय, स्वतःच्या अटींवर जाहीर केली.

या कारवाईदरम्यान भारताने पाकिस्तानच्या सीमा भागात मोठा फटका दिला असून, शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, १०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार करण्यात आले असून, ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. तसेच पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधा देखील नष्ट करण्यात आल्या आहेत.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने विविध जागतिक मित्र राष्ट्रांशी संवाद साधला होता. जरी त्या संवादात कारवाईबाबत तपशील देण्यात आले नव्हते, तरी भारताने कठोर निर्णय घेण्याची भूमिका स्पष्ट केली होती.


मिळालेल्या माहितीनुसार, ७ मे २०२५ रोजी सकाळी DGMO स्तरावर भारताने पाकिस्तानला झालेल्या कारवाईची माहिती दिली होती. भारताने दहशतवादी छावण्यांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याची माहिती अधिकृतपणे पाकिस्तानला कळवली. त्यानंतर पाकिस्तानने १० मे रोजी रात्री भारतातील २६ ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर कडक प्रत्युत्तर देत त्यांच्या ८ एअरबेसवर निशाणा साधला.

भारत सरकारने स्पष्ट केले आहे की पाकिस्तानसोबत आता केवळ लष्करी (DGMO) पातळीवरच संवाद होईल. कोणत्याही राजकीय किंवा आंतरराष्ट्रीय मध्यस्थीला येथे थारा नसेल. यामुळे भारताची भूमिका अधिक ठाम आणि आक्रमक बनली आहे. लष्करालाही कोणत्याही शत्रू हालचालींना योग्य उत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा झाली होती. त्यावेळी मोदी सौदी अरेबियात होते, मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट सांगितले की दहशतवाद्यांचा खात्मा हा आमचा निर्धार आहे.

ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर अवघ्या ३० मिनिटांत बहावलपूर, मुरीदके आणि मुझफ्फराबाद येथील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. युद्धबंदीपूर्वी, ९ मे रोजी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी पंतप्रधान मोदींशी संपर्क साधला होता. भारताने त्या वेळी स्पष्ट केले की, या वेळी भारत गप्प बसणार नाही आणि हे संकट निर्णायक पद्धतीने हाताळले जाईल.