yuva MAharashtra बुधगावमध्ये गॅस कटरने एटीएम मशीन फोडले; १७ लाखांची रोकड चोरी

बुधगावमध्ये गॅस कटरने एटीएम मशीन फोडले; १७ लाखांची रोकड चोरी


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ मे २०२५

बुधगाव (ता. मिरज, जि. सांगली) – बुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनवर धाडसी हात साफ करत सुमारे १७ लाख ४० हजार रुपयांची रोकड लंपास केली. हे चोरटे गॅस कटरचा वापर करून एटीएम मशीन उघडण्यात यशस्वी ठरले. या प्रकारामुळे बुधगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केवळ तीन दिवसांपूर्वीच या एटीएममध्ये २९ लाख रुपयांची रोकड भरली गेली होती. त्यातील अंदाजे १७ लाख ४० हजार रुपये शिल्लक असताना ही चोरी घडली.


चोरट्यांनी पहाटेच्या वेळी चेहऱ्यावर झाकण घालून एटीएममध्ये प्रवेश केला. प्रथम त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा झाकून टाकला. त्यानंतर त्यांच्या इतर साथीदारांनी आत प्रवेश केला आणि नियोजनबद्ध पद्धतीने गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडण्यात आले. एटीएम मशीन उघडून त्यांनी संपूर्ण रोकड चोरी केली.

सकाळी ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. सांगली ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करत तपास सुरू केला. पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि त्यांच्या पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत चौकशी सुरू केली आहे.

सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक माहिती आणि तांत्रिक पुरावे गोळा करून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. बुधगाव एटीएम फोडणे ही गुन्हेगारी घटना अत्यंत नियोजनबद्ध असल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे.