| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १८ मे २०२५
पहलगाममध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्याचा कठोर बदला घेत भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे नेस्तनाबूत केले. पाकिस्तानकडून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होताच, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या लष्करी तळांवर जोरदार कारवाई करून मोठं नुकसान घडवलं. परिणामी, पाकिस्तानला युद्धविरामाची विनंती करावी लागली. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महत्त्वाचं विधान केलं.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रगतीसाठी कोणतीही कसर ठेवलेली नाही. देशाच्या सुरक्षेचा मजबूत पाया घालण्याचं काम त्यांच्या नेतृत्वात पार पडलं. २०१४ पूर्वी सातत्याने देशात दहशतवादी हल्ले घडत असत, मात्र त्यावर कोणताही ठोस प्रतिसाद दिला जात नव्हता. आज मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे आमच्या जवानांनी दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिलं. भारतीय लष्कराच्या धाडसामुळे संपूर्ण देशाचा अभिमान वाढला आहे. अणुबॉम्बच्या धमक्यांना आम्ही आता किंमत देत नाही,” असं शहा म्हणाले.
एका कार्यक्रमात बोलताना अमित शहा यांनी स्पष्ट केलं की, “भारताने पाकिस्तानमध्ये तब्बल १०० किलोमीटर आत घुसून जबरदस्त कारवाई केली. पाकिस्तानची हवाई सशस्त्र तळं उद्धवस्त करण्यात आली. भारताची एअर डिफेन्स यंत्रणा आज अत्यंत मजबूत आहे. त्यामुळे पाकिस्तान घाबरलेला आहे. नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर दहशतवाद्यांकडून तीन मोठे हल्ले झाले. नुकताच पहलगाममध्ये पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी हल्ला केला. मात्र प्रत्येकवेळी मोदी सरकारने ठोस प्रत्युत्तर दिलं. आज जगभरात भारताच्या कारवाईकडे आश्चर्याने पाहिलं जात आहे.”
शहा पुढे म्हणाले, “उरी हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक करून ठोस संदेश दिला. पुलवामा हल्ल्यानंतर एअर स्ट्राईकच्या माध्यमातून प्रचंड कारवाई केली. मात्र पाकिस्तानमधील दहशतवादी थांबले नाहीत. त्यांनी पुन्हा एकदा पहलगाममध्ये हल्ला केला. त्यानंतर ऑपरेशन सिंदूरद्वारे त्यांच्या तळांवर निशाणा साधण्यात आला. संरक्षण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ या ऑपरेशनचं विश्लेषण करताना थक्क होतात,” असं शहा यांनी ठामपणे सांगितलं.