| सांगली समाचार वृत्त |
वडवणी - दि. २६ मे २०२५
नांदेड जिल्ह्यातील पत्रकार संजय सुर्यवंशी यांना अपमानास्पद भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मिडिया परिषदेच्या वतीने वडवणी पोलिस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार संजय सुर्यवंशी यांनी "25 गावे 25 तासांपासून अंधारात" या शीर्षकाखाली दिनांक 22 मे 2025 रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. या बातमीत आमदार बाबुराव कदम यांचा थेट उल्लेख नव्हता, तरीही त्यांच्याकडून संजय सुर्यवंशी यांना दिनांक 22 मे रोजी सकाळी 9:25 वाजता 9822210003 क्रमांकावरून सात वेळा आणि रात्री 8:44 वाजता 9420415921 क्रमांकावरून अपशब्दांचा वापर करत जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणी महाराष्ट्रभर विविध पोलीस ठाण्यांमध्ये निवेदने सादर करण्यात येत असून, मा. श्री. एस.एम. देशमुख यांच्या सूचनेनुसार ही कारवाई केली जात आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला म्हणजेच पत्रकारितेला गालबोट लावणाऱ्या या प्रकाराचा निषेध करत आमदार बाबुराव कदम यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
ही मागणी वडवणी पोलिस ठाण्यात सादर करताना डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे, वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेचे जेष्ठ मार्गदर्शक सुधाकर पोटभरे, तालुकाध्यक्ष सतिश सोनवणे, सचिव महेश सदरे, डिजिटल मिडिया परिषदेचे तालुका अध्यक्ष ओमप्रकाश साबळे, उपाध्यक्ष धम्मपाल डावरे, कोषाध्यक्ष वाजेद पठाण, तसेच पत्रकार गितांजली लव्हाळे, विजय राऊत, अतुल जाधव, संभाजी लांडे, हरी पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
बातमी सौजन्य : चंद्रकांत क्षीरसागर, सांगली.