| सांगली समाचार वृत्त |
जयपूर - दि. २६ मे २०२५
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रीती झिंटा सध्या आपल्या सहृदयतेमुळे चर्चेत आली आहे. अनेक वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक असलेली प्रीती सध्या आयपीएलच्या पंजाब किंग्स संघासाठी भारतात आहे आणि प्रत्येक सामन्यासाठी मैदानावर हजर असते. नुकत्याच घडलेल्या एका कार्यक्रमात तिनं भारतीय सैनिकांच्या कुटुंबांसाठी एक स्तुत्य आणि प्रेरणादायी पाऊल उचललं.
प्रीती झिंटाने दक्षिण-पश्चिम कमांडच्या ‘आर्मी वाइव्ज वेल्फेअर असोसिएशन’ (AWWA) या संस्थेला 1.10 कोटी रुपयांची मदत दिली आहे. ही देणगी पंजाब किंग्स संघाच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमाअंतर्गत देण्यात आली. तिच्या या कृतीतून तिचं देशाशी असलेलं नातं किती खोल आणि दृढ आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
जयपूरमध्ये शनिवारी पार पडलेल्या एका खास कार्यक्रमात प्रीती स्वतः उपस्थित होती. लष्करातील वरिष्ठ अधिकारी आणि अनेक सैनिकांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. या वेळी बोलताना प्रीती म्हणाली, "जवानांच्या कुटुंबांना मदत करणे ही केवळ प्रतिष्ठेची गोष्ट नाही, तर एक सामाजिक जबाबदारी आहे. सैनिकांचं बलिदान अमूल्य आहे, आणि त्यांच्या परिवारांच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे."
प्रीती झिंटाची ही कृती समाजासाठी एक प्रेरणादायक उदाहरण ठरते. स्वतः फौजी कुटुंबातून आलेल्या प्रीतीच्या मनात देशभक्तीची भावना लहानपणापासूनच खोलवर रुजलेली आहे. तिचे वडील, मेजर दुर्गानंद झिंटा, भारतीय सैन्यात सेवा बजावत होते.
वर्कफ्रंटकडे पाहिलं, तर प्रीती झिंटा लवकरच 'लाहोर 1947' या राजकुमार संतोषी दिग्दर्शित चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. आमिर खान निर्मित हा चित्रपट भारत-पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित असून प्रीतीच्या चाहत्यांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.