| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ मे २०२५
ज्याप्रकारे देशाच्या सुरक्षेसाठी कमांडो पथक दहशतवाद्यांविरुद्ध मिशन पार पाडतात, तसाच नवा डिजिटल लढा सायबर हल्ल्यांविरुद्ध उभारण्यात आला आहे. 'सायबर कमांडो' म्हणून ओळखली जाणारी देशभरातील २४७ प्रशिक्षित अधिकाऱ्यांची पहिली तुकडी आता सज्ज झाली आहे. महाराष्ट्रातून ९ जणांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले असून, त्यातील एकमेव महिला आणि राज्यातील पहिल्या सायबर कमांडो सांगली सायबर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहायक निरीक्षक रूपाली बोबडे आहेत.
दहशतवादी जसे त्यांच्या लक्ष्यावर घात करून हल्ले करतात, त्याच धर्तीवर सायबर गुन्हेगार संगणक नेटवर्कमध्ये बेकायदेशीर प्रवेश करून विविध फसवणुकी घडवतात. अशा हल्ल्यांना तांत्रिक पातळीवर तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने ‘इंडियन सायबर कमांडो’ ही अभिनव योजना राबवली आहे.
या योजनेअंतर्गत, पोलिस दलातील तांत्रिक पार्श्वभूमी असलेल्या कर्मचाऱ्यांना एकाच दिवशी घेतलेल्या देशव्यापी परीक्षेनंतर प्रशिक्षणासाठी निवडण्यात आले. देशातील विविध नामांकित संस्थांमध्ये, जसे की आयआयटी मद्रास आणि नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी, या ठिकाणी सहा महिने सखोल प्रशिक्षण देण्यात आले.
रूपाली बोबडे, मूळच्या नाशिकच्या, २०१२ पासून पोलिस सेवेत आहेत. मुंबईतील महाराष्ट्र सायबर सेलमध्ये सात वर्षांची अनुभवाची शिदोरी घेऊन त्या सध्या सांगली सायबर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. आयआयटी मद्रासमध्ये प्रशिक्षण पूर्ण करून त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला सायबर कमांडो ठरल्या आहेत. त्यांच्या सोबत शैलेश साळुंखे आणि विवेक सावंत यांनीही हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले.
सायबर कमांडोना सायबर सुरक्षेचे गूढ समजून घेऊन, हल्ले ओळखणे, त्यांना वेळेत रोखणे, आर्थिक फसवणुकीविरोधात जनजागृती करणे आणि गुन्हे उघडकीस आणणे अशा विविध स्तरांवर प्रशिक्षण देण्यात आले आहे.
पाच वर्षांत पाच हजार सायबर कमांडो
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढील पाच वर्षांत देशभरात ५,००० सायबर कमांडो घडवण्याचा संकल्प केला आहे. त्यातील २४७ अधिकाऱ्यांचा पहिला गट सध्या सेवा बजावत आहे.
सायबर गुन्हेगारांचे धंदे दिवसेंदिवस बदलत आहेत. त्यामुळे नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. सायबर पोलिस विभागामार्फत जनजागृती मोहीम सुरू आहे आणि हे सायबर कमांडो देशाच्या डिजिटल संरक्षणासाठी नेहमी सज्ज असतील, असे सहायक निरीक्षक रूपाली बोबडे यांनी सांगितले.