| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ मे २०२५
गुन्हेगारी जगतातील कुख्यात गजा मारणे याचा प्रमुख सहकारी म्हणून ओळखला जाणारा बाळकृष्ण ऊर्फ पांड्या मोहिते (वय ४०, रा. सितारामनगर, सांगली) याला सांगली गुन्हे शाखेने अटक केली आहे. येरवडा कारागृहातून गजा मारणे याला सांगलीत हलवले जात असताना, त्याच्या समर्थकांनी कारागृहासमोर घोषणाबाजी केली. यात मोहितेने नेतृत्वाची भूमिका बजावल्याचे उघड झाले आहे.
पांड्या मोहितेने गजा मारणे टोळीचे सांगलीतील वर्चस्व टिकवण्यासाठी ४० ते ५० जणांची टीम तयार केली होती. हे सर्व जण सांगली कारागृहाबाहेर जमले होते. गजा मारणेची भेट घेऊन त्याच्या नावाने घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास करत असताना आणखी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पोलिस व्हॅन सांगलीकडे जात असताना साताऱ्यातील कणसे ढाब्यावर काही काळ थांबण्यात आले. त्यावेळी मारणे समर्थकांनी पोलीस व्हॅनचा पाठलाग करत तेथे पोहोचून, त्याला औषधे, रोख पैसे आणि जेवण पुरवले. या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक पुरावे हाती आल्यावर संपूर्ण कट उघडकीस आला.
या कारवाईत सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ यांचाही सहभाग निष्पन्न झाला असून, तिघांवर कोथरूडमधील गुन्ह्यात 'मोक्का' अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पांड्या मोहितेला १४ मे रोजी अटक करण्यात आली असून, त्याला १७ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपीने गजा मारणे याला आर्थिक आणि अन्य स्वरूपाची मदत केली असून, त्याच्या टोळीतील इतर सदस्यांचा शोध घेणे गरजेचे आहे. तसेच, पाठलाग करत आलेल्या गाड्याही पोलिसांनी ताब्यात घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे आणि पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणात महत्वाची भूमिका बजावली.