| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ११ मे २०२५
जत तालुक्यातील वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. शासनाने जत येथे स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) कार्यालय स्थापन करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. या कार्यालयामार्फत 'एमएच 59' असा नवीन वाहन नोंदणी क्रमांक देण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे जत आणि परिसरातील नागरिकांना वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स, कर भरणा आदी कामांसाठी आता सांगलीसारख्या दूरच्या ठिकाणी जावे लागणार नाही. नवीन RTO कार्यालयासाठी शासकीय किंवा खासगी जागा भाडे तत्वावर घेण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या कार्यासाठी परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पावले उचलली जाणार आहेत.
प्रारंभी, आवश्यक कर्मचारी इतर कार्यालयांतून तात्पुरते समायोजित केले जातील, तर पुढील टप्प्यात नवीन पदे निर्माण केली जाणार आहेत. वाहतूक नियंत्रणासाठी एक इंटरसेप्टर वाहनही प्रस्तावित करण्यात आले असून, त्यासाठी वाहन आढावा समितीची मंजुरी आवश्यक आहे.
या कार्यालयाच्या दैनंदिन खर्चासाठी ‘2041 – वाहनांवरील कर’ या शासकीय खात्यातून निधी मंजूर करण्यात येणार आहे. तोपर्यंतच्या खर्चासाठी सध्याच्या निधीतून व्यवस्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. जतवासीयांना वाहनासंबंधीच्या कामांसाठी सांगलीपर्यंत प्रवास करावा लागत असल्याने त्यांची होणारी गैरसोय त्यांनी विधानसभेत मांडली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूकपूर्व आश्वासनानुसार जतला उपप्रादेशिक RTO कार्यालय देण्याचे वचन पूर्ण करून हे स्वप्न साकार केले आहे.