| सांगली समाचार वृत्त |
लेह - दि. ११ मे २०२५
देशात सध्या भारत - पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक विमानतळांवरील उड्डाणसेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. यामध्ये लेह विमानतळाचाही समावेश असून, त्यामुळे तिथं पोहोचलेले अनेक पर्यटक प्रवास न मिळाल्याने अडकून पडले आहेत.
या परिस्थितीत पर्यटकांच्या मदतीसाठी स्थानिक हॉटेल संघटनांनी पुढाकार घेतला आहे. काही हॉटेलांनी पर्यटकांच्या मुक्कामात वाढ करून निवासाची व्यवस्था मोफत केली आहे. त्याच वेळी महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी एक विशेष आधार ठरत आहे सांगलीची एक मराठमोळी जोडी – सांगलीचे उद्योगपती संदीप सोले कन्या ग्रीष्मा आणि तिचे सहकारी कौस्तुभ.
समुद्रसपाटीपासून 11,562 फूट उंचावर... महाराष्ट्राच्या माणूसकीचा हात
लेहच्या मध्यवर्ती भागात, गेली दोन-अडीच वर्षं ग्रीष्मा आणि कौस्तुभ ही जोडी ‘खानावळ’ नावाचं हॉटेल चालवत आहेत. महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना घरच्या चवीनं परिपूर्ण जेवणाची सोय त्यांनी तिथं उपलब्ध करून दिली आहे. मात्र सद्यस्थितीत, हे हॉटेल अडकलेल्या पर्यटकांसाठी केवळ जेवण नाही, तर एक मानसिक आधार ठरतंय – घरापासून दूर असूनही 'आपले' कोणी इथे आहेत, ही जाणीव देतंय.
"घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत!"
‘खानावळ’च्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यात ग्रीष्मा आणि कौस्तुभ यांनी अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मदतीचा हात दिला आहे. त्यांनी म्हटलं आहे की – "लेह विमानतळ काही दिवस बंद राहणार आहे, पण घाबरू नका. जर तुम्ही येथे असाल आणि अडचणीत असाल, तर आम्ही नेहमी तुमच्या मदतीसाठी तयार आहोत."
त्यांनी मदतीसाठी थेट संपर्क करण्यासाठी आपले मोबाईल क्रमांकही शेअर केले आहेत:
ग्रीष्मा: 9970657647
कौस्तुभ: 8655539525
'खानावळ' हॉटेलचा पत्ता:
पहिला मजला, एअरटेल ऑफिसच्या वर, लेह मेन मार्केट, लेह, युनियन टेरिटरी लडाख
अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षा आणि मार्गदर्शन
सीमावर्ती भागातील तणावामुळे पर्यटकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. मात्र, लष्कर आणि पोलिस प्रशासनाने येथे सुरक्षेची मजबूत व्यवस्था उभारली असून, नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत मार्गदर्शन घेऊन निर्णय घ्यावा, असं आवाहन ग्रीष्मा आणि कौस्तुभ यांनी केलं आहे.
हवाई सेवा बंद असल्याने काही प्रवाशांनी रस्तामार्गाने परतीचा विचार केला असला, तरी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी खात्रीशीर माहिती मिळवणं आणि स्थानिक यंत्रणेशी समन्वय ठेवणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.