yuva MAharashtra अण्णा भाऊ साठे स्मारकासाठी वाटेगाव येथे जागा निश्चित; 25 कोटींच्या निधी उपलब्ध !

अण्णा भाऊ साठे स्मारकासाठी वाटेगाव येथे जागा निश्चित; 25 कोटींच्या निधी उपलब्ध !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ मे २०२५

प्रसिद्ध लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मभूमी वाटेगाव (ता. वाळवा) येथे राष्ट्रीय स्तरावरील स्मारक उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. स्मारकासाठी लागणारी जागा बापू तलावाच्या परिसरात उपलब्ध झाली असून, तब्बल पाच एकर शासकीय जमिनीवर हे भव्य स्मारक साकारले जाणार आहे. या माहितीची पुष्टी अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी केली.

सचिन साठे यांनी सांगितले की, राज्य सरकारने स्मारकासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र जागेचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नव्हता. आता ती अडचण दूर झाली असून वाटेगाव येथे स्मारकासाठी ठिकाण निश्‍चित करण्यात आले आहे.

या स्मारकासाठी झालेल्या पुढाकारामध्ये आमदार सत्यजित देशमुख यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. त्यांच्या प्रयत्नातून मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह झालेल्या बैठकीत स्मारकाच्या भूमिपूजनाची चर्चा करण्यात आली. हे भूमिपूजन येत्या १ ऑगस्ट रोजी, अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीदिनी पार पडण्याची शक्यता आहे.


साठे यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून राज्यभर अण्णा भाऊ साठे यांचे अनुयायी स्मारकासाठी आंदोलने आणि मोर्चे काढत होते. या मागणीला प्रतिसाद देत खासदार धैर्यशील माने आणि आमदार देशमुख यांनी शासन पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर निधी मंजूर करून घेतला.

या कार्यात समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त मेघराज भाटे, जिल्हाधिकारी अशोक काकडे, ग्रामपंचायत सरपंच नंदा चौगुले, माजी सरपंच सुरेश साठे यांचे सहकार्य लाभले. जागा उपलब्ध झाल्याने आता स्मारकाच्या उभारणीस वेग मिळणार आहे.

यावेळी शिष्टमंडळात अण्णा भाऊ साठे क्रांती सेनेचे राष्ट्रीय सचिव गणेश भगत, प्रदेशाध्यक्ष राजभाई क्षीरसागर, कोअर कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. त्र्यंबक कांबळे, पूर्व प्रदेशाध्यक्ष राधाकृष्ण साठे, आकाश घोलप आदी मान्यवर सहभागी होते.

सत्यजित देशमुख यांचा विशेष पुढाकार

स्मारकाच्या प्रक्रियेत आमदार सत्यजित देशमुख यांनी सक्रीय सहभाग घेतला. त्यांनी अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासह मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांची भेट घेऊन स्मारकासाठी निर्णायक पावले उचलली. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच हा दीर्घकालीन विषय आता मार्गी लागल्याचे सचिन साठे यांनी सांगितले.