| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. २८ एप्रिल २०२५
भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम हे शिक्षण, सहकार, आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रात द्रष्टेपणाने कार्य करणारे नेते होते. त्यांनी केवळ शैक्षणिक पदवी मिळवली नाही तर समाजभानही बाळगले होते. ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नव्या वाटा खुल्या करून देण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला, असे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केले.
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात डॉ. तारा भवाळकर यांना जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामध्ये एक लाख रुपयांची रक्कम व मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी सत्काराचा स्वीकार करताना त्या आपले विचार व्यक्त करत होत्या.
समारंभात राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह व आमदार डॉ. विश्वजित कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, कुलसचिव जी. जयकुमार, आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, सहकार्यवाह व. भा. म्हेत्रे, डॉ. एम. एस. सगरे, डॉ. के. डी. जाधव यांचीही उपस्थिती लाभली होती.
डॉ. पतंगराव कदम यांनी तत्त्वनिष्ठ राहून भारती विद्यापीठाची उभारणी केली आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची दारे खुली केली, असे प्रतिपादन मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी केले.
मंगल प्रभात लोढा यांनी विद्यापीठात कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी लवकरच मंजुरी देण्याचे आश्वासन दिले.
डॉ. शिवाजीराव कदम यांनी विद्यार्थ्यांचे व्यवहारज्ञान वाढवण्यासाठी विद्यापीठ कौशल्य विकासावर भर देत असल्याचे सांगितले. डॉ. विश्वजित कदम यांनी सलग चौथ्यांदा विद्यापीठाला मिळालेल्या NAAC ए++ मानांकनाचा उल्लेख करून अभिमान व्यक्त केला. डॉ. विवेक सावजी यांनी विद्यापीठाच्या यशस्वी वाटचालीचा आढावा सादर केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजेंद्र उत्तूरकर व प्रा. डॉ. ज्योती मंडलिक यांनी केले.