| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ एप्रिल २०२५
जैन समाजातील मोजके लोक (५ %) श्रीमंत आहेत. तेच टॅक्स भरतात. मोठ्या संख्येने जैन सामान्य आर्थिक स्थितीमधील आहेत. असंख्य जैन कुटुंबे अतिअल्पभूधारक, अल्पभूधारक व भूमीहीन आहेत.
सरसकट जैन श्रीमंत नाहीत अथवा सगळे आयकर भरण्याइतपत सक्षम नाहीत.
अल्पसंख्याक दर्जा आहे म्हणून जैन बऱ्यापैकी सुरक्षित आहेत. मंदीरे, तीर्थक्षेत्रं रक्षण अल्पसंख्याक दर्जा असेपर्यंतच खात्री आहे. हा दर्जा नाकारता येणार नाही. जैनांनी राजकारणात सक्रिय राहिलेच पाहिजे. त्याशिवाय समाजाची कामे होणार नाहीत अथवा तुम्हाला जमेत धरले जाणार नाही. जैनांनी राजकारणात वट निर्माण करु नये हेही षडयंत्र आहे. मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजाने राजकारणात ताकद दाखवून सत्तेची जमात बना असे सांगितले होते. त्याशिवाय तुमचा विकास व प्रतिष्ठा साध्य होणार नाही असे स्व. आण्णासाहेब लठ्ठे व सव. कळंत्रे आक्का म्हणायचे.
जैन समाजाने घटनादत्त लाभ शासनाकडे मागू नयेत अशी समाजाची मानसिकता तयार करणे व सगळे जैन श्रीमंत आहेत असा चुकीचा समज बहुजन समाजात पसरवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न कांही मंडळी करत असतात. जैन समाजाने सदसद्विवेकबुद्धीने वाटचाल व विचार करुन पावले उचलावीत. हेच शहाणपणाचे आहे. जैन समाजाने दक्षिण भारत जैन सभेच्या इतिहासाचे अवलोकन केल्यास खरा जैन समाज कळेल. यासाठी दक्षिण भारत जैन सभेच्या प्रवाहात समाज येणे अपेक्षित आहे. हेच प्रथमाचार्य शांतीसागर महाराज, दिवाण बहादूर आण्णासाहेब लठ्ठे, कळंत्रे अक्कांनी आणि वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांनी सांगितले आहे. आजही जैन समाज पंचकल्याणक पूजेवर अवाढव्य खर्च करतो, त्याचे संस्कार वैदिक काळात झाले आहेत.
तीर्थंकर आणि आगमशास्त्रापासून जैन समाजाला भरकटायला लावण्याचे षडयंत्र या देशात कायमच रचले जाते. त्याला बळी पडून चालणार नाही. वैज्ञानिक आणि आरोग्यदृष्ट्या आपला जैन धर्म कसा सहाय्यभूत आहे हे वास्तव लक्षात घेऊन आत्मकल्याणाबरोबर समाजहितासाठी योग्य सदाचरण हे आव्हान आहे. ते लिलया पेलण्यासाठी सज्ज असलेली पिढी निर्माण करणे ही काळाची गरज आहे. बाकी कांही मुद्दे जैन समाजाचे वास्तव योगदान व महत्व नमूद करणारे जरुर आहेत. परंतु आर्थिक स्थिती, राजकारण आणि अल्पसंख्याक दर्जा याबाबतचे मुद्दे बाकीच्या मुद्द्यांना निष्प्रभ करुन मुद्दाम जैन समाजाला हवेत ठेवणारे व अधिकार व सत्तेपासून लांब ठेवणारे आहेत. समाजाचे पाय कायम जमीनीवर रहावेत यासाठी उभी हयात खर्च केलेल्या आपल्या कर्तबगार नेत्यांचा विसर पाडणाऱ्या आहेत.
आपल्या समाजाला राजाश्रय आणि घटनादत्त अधिकार नाकारण्यासाठी श्रीमंती, राजकारणापासून लांब रहा आणि अल्पसंख्याक दर्जा याबाबत जैन व्यक्तींकडूनच असे षडयंत्र त्यांना प्रोत्साहन देऊन रचले जाते. केंद्रस्तरीय अल्पसंख्याक दर्जा पूर्ववत चालू राहण्यासाठी दक्षिण भारत जैन सभेला कायदेशीर व रस्त्यावरची लढाई लढावी लागली. म्हणून समाजाचे अस्तित्व आणि अस्मिता शाबूत राहिली आहे हे विसरून चालणार नाही.
केंद्र अथवा राज्य स्तरावरील अल्पसंख्याकांचे लाभ मिळणे ही आवश्यक बाब आहे. आम्ही आर्थिकदृष्टय़ा सक्षम नाही. आमची राजकीय पत म्हणावी तेवढी लक्षवेधी नाही. ऐक्य अजूनही दुबळे आहे. बेरोजगारीमुळे जैन युवावर्ग हतबल आहे. जैन समाजातील शेतमजूर व कामगार वर्ग जगण्यासाठी संघर्ष करतो आहे. उच्च शिक्षणासाठी आमच्या मुलांना पैसा कमी पडतो. शिक्षण थांबतं. आमची तीर्थक्षेत्रं, तीर्थंकर, मंदिरं सुरक्षित नाहीत. अशा बिकट प्रसंगी दक्षिण भारत जैन सभेने कांही आश्वासक पावले उचलली आहेत.
श्रीमंती आणि सर्वात जास्त इन्कम टॅक्स भरतो असा फाटका ढोल महानगरातील एसी बंगल्यात बसून बडवाणाऱ्यांनी जरुर बडवावेत परंतु सरसकट जैन समाजाने बडवणे धोक्याचे आहे. जैन समाजाने जागे राहावे.. रात्र वैऱ्याची आहे..!
प्रा. एन.डी.बिरनाळे
महामंत्री (सांगली)
दक्षिण भारत जैन सभा