| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ एप्रिल २०२५
भारतीय टपाल खात्याच्या घरपोच आंबे विक्री उपक्रमाला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सांगलीच्या प्रधान पोस्ट कार्यालयाने केवळ दोन दिवसांत तब्बल ४ लाख ७८ हजार ७५० रुपयांचे हापूस आंबे विकले. या योजनेतून ६२५ रुपये प्रति डझन दराने ७६६ डझन आंब्यांची घरपोच विक्री करण्यात आली.
कोरोनानंतर पोस्ट खात्याने थेट शेतकऱ्यांच्या बागेतून ग्राहकांपर्यंत आंबे पोहोचवण्याची सेवा सुरू केली होती. यावर्षी सांगलीच्या प्रधान पोस्ट कार्यालयाने १७ व १९ एप्रिल रोजी बुकींग घेऊन, २१ व २२ एप्रिल रोजी ग्राहकांना आंबे वितरित केले.
गेल्या तीन वर्षांतील आंबे विक्रीचा आढावा :
२०२२: ५७ हजार रुपयांची विक्री (१५० डझन)
२०२४: १ लाख ७८ हजार २०० रुपयांची विक्री (१९८ डझन)
२०२५: ४ लाख ७८ हजार ७५० रुपयांची विक्री (७६६ डझन)
कोठे कराल बुकींग ?
उत्तम प्रतीचे हापूस आंबे मिळवण्यासाठी ग्राहकांनी सांगली प्रधान कार्यालय, सांगली सिटी पोस्ट, विश्रामबागेतील विलिंग्डन पोस्ट, मिरज पोस्ट किंवा इस्लामपूर पोस्ट कार्यालय येथे संपर्क साधावा.
तीन वर्षांत १,११४ डझन आंब्यांची विक्री :
पोस्ट खात्याने गेल्या तीन वर्षांत एकूण १,११४ डझन आंब्यांची घरपोच विक्री केली आहे. शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांपर्यंत दर्जेदार व सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले आंबे पोहोचवण्यावर भर देण्यात आला आहे. ग्राहकांची फसवणूक टाळून योग्य दरात शुद्ध आंबे देणे हाच आमचा उद्देश आहे, असे प्रवर अधीक्षक बसवराज म. वालीक यांनी सांगितले.