yuva MAharashtra मिरजेतील काँग्रेसच्या बैठकीत वादाची ठिणगी; आरोप-प्रत्यारोप, कार्यकर्त्यात झटापट !

मिरजेतील काँग्रेसच्या बैठकीत वादाची ठिणगी; आरोप-प्रत्यारोप, कार्यकर्त्यात झटापट !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ एप्रिल २०२५

मिरज – काँग्रेस पक्षाला नवी दिशा देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या मिरजेतील एका बैठकीत वातावरण चांगलेच तापले. पक्षाची मरगळ झटकून कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या ठिकाणी पक्षांतर्गत वाद उफाळून आल्याने बैठक गोंधळातच पार पडली.

गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात पार पडलेल्या या बैठकीत सुरुवातीलाच वादाला तोंड फुटले. शहराध्यक्ष संजय मेंढे यांनी, "मी मिरज शहराचा अध्यक्ष असूनही मला बैठकीबाबत कोणतीही कल्पना देण्यात आली नाही," असा आक्षेप घेत निरीक्षकांना प्रश्न विचारले. यावरून बैठक अधिकच चिघळली.

काही कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत बंडखोर उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झाल्याचा मुद्दा उपस्थित करत मेंढेंना धारेवर धरले. दुसरीकडे, मेंढे यांनीच निरीक्षकांवर पक्षांतर्गत निवडीसंदर्भात पक्षात फूट पाडण्याचा आरोप केला. यामुळे वातावरण आणखी तापले आणि काही क्षणी उपस्थितांमध्ये जोरदार वाद, अगदी धक्काबुक्कीपर्यंतची वेळ आली.


ही बैठक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार राज्यभरात घेतल्या जाणाऱ्या बैठकींच्या मालिकेचा भाग होती. या बैठकीस माजी आमदार रामहरी रूपनवर व आदित्य पाटील हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, माजी महापौर किशोर जामदार, अय्याज नायकवडी व अकबर मोमीन यांचाही सहभाग होता.

या बैठकीत पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाईबाबतचे प्रस्ताव आधीच प्रदेश समितीकडे पाठवले असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले. तसेच, या बैठकीत घडलेल्या प्रकारांचा अहवाल निरीक्षकांकडून प्रदेश नेतृत्वाला सादर केला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.