| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ एप्रिल २०२५
राज्यातील वरिष्ठ मंत्री म्हणून मी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. फक्त 'गृहमंत्री'पदच आता उरले आहे, असे सूचक विधान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
तासगाव येथील शिवनेरी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने सुमारे ४.६५ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या भव्य दुर्गामाता मंदिरात सध्या प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आयोजित महाआरतीला पालकमंत्री पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. महाआरतीनंतर उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी वरील विधान केले.
पाटील यांनी शिवनेरी मंडळाच्या कार्याची प्रशंसा करत म्हटले, की आज अनेक तरुण मंडळे जयंती उत्सव साजरे करत असताना निधीचा वापर डॉल्बी वा इतर फालतू गोष्टींवर करतात. मात्र, शिवनेरी मंडळाने समाजासमोर एक सकारात्मक उदाहरण ठेवले आहे. त्यांनी सातत्याने दहीहंडीसारख्या उपक्रमांतून उभारलेल्या निधीतून दुर्गामाता मंदिराची उभारणी केली असून, हा खरोखर प्रेरणादायी उपक्रम आहे.
हे मंदिर भविष्यात सर्वांसाठी एक शक्तिस्थळ ठरेल, असा विश्वासही मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.