yuva MAharashtra आ. गोपीचंद पडळकर यांचा आग्रह मान्य करीत दिले आश्वासन !

आ. गोपीचंद पडळकर यांचा आग्रह मान्य करीत दिले आश्वासन !


| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. १४ एप्रिल २०२५

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले असून त्यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजिलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी ते पुण्यात काही वेळ थांबले आणि याच दरम्यान भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

अमित शाह 11 एप्रिलच्या रात्री पुण्यात दाखल झाले होते. त्याच दिवशी पडळकरांनी त्यांची भेट घेऊन अहमदनगरमध्ये येत्या मे महिन्यात आयोजित होणाऱ्या अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सवासाठी खास निमंत्रण दिलं. या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी त्यांनी शाह यांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची विनंती केली.


या विनंतीला प्रतिसाद देत, अमित शाह यांनी कार्यक्रमासाठी स्वतः उपस्थित राहण्याचे आश्वासन तत्काळ दिल्याचे पडळकरांनी सांगितले. त्यांनी याबाबत एक्स (माजी ट्विटर) वर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. त्यामध्ये त्यांनी शाह यांच्या व्यक्तिमत्त्वातील हिमालयासारखी दृढता अनुभवायला मिळाली, असेही म्हटले आहे.

पडळकरांनी आपल्या पोस्टमध्ये कलम 370 रद्द करणे, तसेच CAA आणि NRC च्या अंमलबजावणीसारखे ठोस निर्णय गृहमंत्री म्हणून शाह यांनी घेतल्याचा उल्लेख करत, हे निर्णय फक्त धोरणात्मक नसून ‘हिंदू राष्ट्र’ संकल्पनेच्या दिशेने उचललेले ठाम पावले असल्याचे मत व्यक्त केले आहे.