| सांगली समाचार वृत्त |
जयसिंगपूर - दि. १४ एप्रिल २०२५
जयसिंगपूर येथील प्रा. सागर बोराडे यांची राज्यस्तरीय प्रमुख तज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी त्यांच्या निवडीचे पत्र नुकतेच दिले आहे. इयत्ता दहावीच्या व्यक्तिमत्त्व विकास व समाजकार्य या विषयाच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी येत्या जूनपासून होत आहे. प्रत्येक विभागातील प्रत्येक शाळा, महाविद्यालयातील या विषयाच्या शिक्षकांचे राज्य स्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील प्रशिक्षणाकरीता तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करण्यासाठी विभागीय मंडळाकडून विषयतज्ञांना प्रत्यक्ष प्रशिक्षणापुर्वी राज्यस्तरीय प्रमुख तज्ञ मार्गदर्शकांकडून विषयाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने प्रा. सागर बोराडे यांची राज्यस्तरीय प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवड केली आहे. प्रा. बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले तज्ञ संबंधित विभागीय मंडळात विभाग व जिल्हा स्तरावर विषय तज्ञ मार्गदर्शक म्हणून पुढील काळात काम करणार आहेत.
प्रा. सागर बोराडे हे सांगली येथील शांतिनिके तन महाविद्यालयात केंद्र संयोजक म्हणून कार्यरत आहेत. सडेतोड स्तंभलेखक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी आजपर्यंत विविध पाच पुस्तकांचे स्वतंत्रपणे लेखन केले आहे. त्यांचे वृत्तपत्र व्यवस्थापन हे मराठीतील एकमेव पुस्तक विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या अभ्यासक्रमासाठी अभ्यासले जाते. दागिना, गाव एक नंबरी, निर्धार आदी मराठी चित्रपटांतून त्यांनी विविधरंगी भूमिका केल्या आहेत. राज्य शासनाच्या समता व सामाजिक न्याय विभागाच्यावतीने निर्माण करण्यात येणाऱ्या पाच चित्रपटांसाठी त्यांनी संशोधक व समन्वयक म्हणून काम पाहिले आहे.
नाट्य, चित्रपट, साहित्य आणि सामाजिक कार्य या क्षेत्रांत प्रा. सागर बोराडे यांनी गत ३० वर्षांपासून उल्लेखनिय कार्य केलेले आहे. त्यांना थोर विचारवंत प्राचार्य, डॉ. पी. बी. पाटील, पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. प्रताप बा. पाटील यांचे मार्गदर्शन तर नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील-यड्रावकर, जयसिंगपूर नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती राजू झेले यांचे सहकार्य लाभले. या निवडीबद्दल प्रा. सागर बोराडे यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.