| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १२ एप्रिल २०२५
भारताच्या विविधतेचा अनुभव घेण्यासाठी रिक्षाने प्रवास करणारे तिघे ऑस्ट्रेलियन नागरिक नुकतेच मिरजेत पोहोचले. मात्र, वाहतूक नियमांची चौकशी करताना त्यांची रिक्षा थेट पोलिस ठाण्यात पोहोचली. मात्र, शिक्षा न होता त्यांना मिळाला खास भारतीय पाहुणचार — ज्यामुळे हे पर्यटक भारावून गेले.
प्रवासाची सुरुवात त्यांनी केरळ राज्यातून केली होती आणि राजस्थानमधील जैसलमेर हे त्यांचे पुढचे लक्ष्य होते. या प्रवासादरम्यान महाराष्ट्रातील मिरजमध्ये त्यांच्या रिक्षाची तपासणी करण्यात आली. रिक्षामध्ये ठेवलेले पेट्रोलचे दोन कॅन पाहून पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून त्यांना पोलिस ठाण्यात आणले.
पाहुणचार आणि मार्गदर्शनाचा अनुभव
पोलिस ठाण्यात त्यांना भारतातील वाहतूक नियम समजावून सांगण्यात आले. पेट्रोल ज्वलनशील असल्यामुळे त्याची वाहतूक सुरक्षित नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच, प्रवासात मद्यपान टाळावे आणि नियमांचे काटेकोर पालन करावे, असा सल्लाही देण्यात आला.
या तिघांकडे ऑल इंडिया परमिट असल्यामुळे पोलिसांनी त्यांच्या भावना समजून घेत त्या पाहुण्यांचे विशेष स्वागत केले. त्यांना कॉफी देऊन गप्पा रंगल्या आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
पोलिसांचा अनुभव संस्मरणीय – पर्यटकांची भावना
“पोलिस ठाण्यात जाताना थोडा तणाव वाटत होता. मात्र, आत गेल्यावर आदरातिथ्य आणि प्रेम मिळालं. कॉफीचा आस्वाद घेतल्यावर खूप समाधान वाटलं,” असं सांगितलं एमा हिने, जी या प्रवासातील एक पर्यटक आहे.
“प्रवासी मॅट, टीम आणि एमा यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्यात आली. त्यांनीही त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली,” अशी माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील गिड्डे यांनी दिली.