yuva MAharashtra आ. सुरेश धस यांच्या रडारवर धनंजय मुंडे का ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चुप्पीमुळे सर्वत्र आश्चर्य !

आ. सुरेश धस यांच्या रडारवर धनंजय मुंडे का ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चुप्पीमुळे सर्वत्र आश्चर्य !

फोटो सौजन्य  - गुगल फोटो गॅलरी

| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १३ जानेवारी २०२५

मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात वाल्मिकी कराड यांचे नाव गोवण्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या सुरुवातीपासून आघाडीवर होत्या. वाल्मिकी कराड आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची मैत्री असल्याचा फुल प्रूफ दावा दमानिया यांनी केल्यानंतर बीडचे वरिष्ठ नेते आ. धस यांनी हे प्रकरण खऱ्या अर्थाने धसास लावले. वाल्मिकी कराडला मोक्का लावा या मागणीसह त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्यपूर्ण लावून धरली आहे.

वास्तविक आ. सुरेश धस हे धनंजय मुंडे यांचे एकेकाचे सहकारी. जवळचे मित्र. त्यांच्या निवडणुकीत धस हे नेहमीच आघाडीवर असायचे. परंतु सध्या ते भाजपमधून आमदार झाले आहेत. असे असतानाही धस यांच्या रडारवर धनंजय मुंडे का ? मित्र पक्षाच्या मंत्र्याला टार्गेट करूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे का गप्प आहेत ? इतके सारे पुरावे असतील तर धनंजय मुंडे यांना अभय का ? असा प्रश्न राज्यातील नागरिकांना पडला आहे.

खरे तर याचे उत्तर उघड गुपित आहे. धनंजय मुंडे हे बीड- परभणीचे बाहुबली... आपल्याला जड होत असलेल्या प्रत्येकाचाच काटा काढण्याचा मुंडे यांचा डाव असतो. अगदी त्यांच्या चुलत भगिनी पंकजा मुंडे यांनाही धनंजय मुंडे यांचा 'कांटे की चाल' चा प्रत्यय आला आहे. मग डोईजड होत असलेल्या सुरेश धस यांना धनंजय मुंडे कसे सोडतील ? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.


आ. सुरेश धस यांचे राष्ट्रवादीमध्ये प्रस्थ वाढत असल्याचे पाहतच धनंजय मुंडे यांनी धस यांचे पंख कापण्यास सुरुवात केली. हे लक्षात येताच धस यांनी त्यांचे राजकीय विरोधक असलेल्या पंकजा मुंडे यांचा पदर पकडला. भाजपामधून वाटचाल करीत असताना ते नेहमीच धनंजय मुंडे यांच्या वाकड्यात शिरले. बीड मधील आष्टी तालुक्यातील जामगाव येथील एका सामान्य कुटुंबातील सुरेश धस यांनी आपली राजकीय कारकीर्द सुखकर करण्यासाठी मोठे कष्ट घेतले आहेत.

आता आ. सुरेश धस हे ना. धनंजय मुंडे यांच्या मित्रपक्ष असलेल्या भाजपचे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे संबंध जवळचे. संतोष देशमुख प्रकरणात महाराष्ट्र सरकार, भाजपा आणि स्वतः देवेंद्र फडणवीस अडचणीत आले असतानाही ते आ. धस यांना धनंजय मुंडे यांच्या विरोधातील मोहीम थांबवण्याचा आदेश का देत नाहीत ? अंजली दमानिया आणि आ. सुरेश धस हे वाल्मिकी कराड व धनंजय मुंडे यांच्यातील मैत्रीचे पुरावे देऊनही तसेच सामुहिक गुन्हेगारीच्या ज्वालामुखीवर उभे केलेल्या बीड-परभणीला वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस ठाम भूमिका घेण्यास हा कचरत आहेत ? असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे.

पैकी आ. सुरेश धस यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपा नेतृत्वाला राष्ट्रवादीची लोकप्रियता कमी करावयाची असल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. तर बीड मधील मुंडे कुटुंबीयांचे प्राबल्य कमी करण्याचा प्रयत्नही या माध्यमातून केला जात असल्याची चर्चा दिसून येत आहे.

काही असले तरी, सध्या राजकीय वातावरण गढूळ होत असून महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत आहे. आता अधिक अंत न पाहता देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या प्रकरणात ठोस भूमिका घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.