yuva MAharashtra आजपासून प. पू. सद्गुरु तात्यासाहेब कोटणीस महाराज यांच्या १०१ व्या पुण्यतिथी निमित्त नित्य कीर्तन व धार्मिक कार्यक्रम सुरुवात !

आजपासून प. पू. सद्गुरु तात्यासाहेब कोटणीस महाराज यांच्या १०१ व्या पुण्यतिथी निमित्त नित्य कीर्तन व धार्मिक कार्यक्रम सुरुवात !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १३ जानेवारी २०२५

प. पू. श्री सद्गुरू तात्यासाहेब कोटणीस महाराज यांचा १०१ पुण्यतिथी महोत्सव आणि नित्य कीर्तनाचा शतकोत्तर वर्षाचा शुभारंभ आज पासून कैवल्य धाम येथे सुरू झाला आहे. 19 जानेवारी अखेर आयोजित करण्यात आलेल्या मंगलमय उत्सवात भजन, पालखीसेवा, प्रवचन, व्याख्यान, गायन आदी कार्यक्रमांची रेलचेल असल्याची माहिती ह भ प गुरुनाथ कोटणीस महाराज यांनी पत्रकार बैठकीत दिली.

याबाबत माहिती देताना कोटणीस महाराज म्हणाले की, या उत्सवात श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त ह. भ. प. निरंजननाथ महाराज, रमाकांत व्यास यांची प्रवचने प्रमुख आकर्षण असणार आहे. दिनांक 14 जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात ह. भ. प. दीपक केळकर, वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांचे प्रवचन होईल. तर रात्री ह. भ. प. पराग महाराज यांचे कीर्तन होणार आहे. तर महेश भावे यांचे श्री विष्णुसहस्रनाम या विषयावर प्रवचनाचा दुसरा भाग होईल.


दिनांक 15 जानेवारी रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता नित्य कीर्तनाच्या शतकोत्तर आरोपी महोत्सवी वर्षाचा शुभारंभ होणार असून यासाठी, करवीर पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य विद्या नृसिहभारती स्वामी, चिमड मठाचे जनार्दन महाराज यरगट्टीकर, श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन, आ. सुधीर दादा गाडगीळ यांची प्रमुख उपस्थिती असेल. यावेळी संजय कोटणीस व धनंजय दीक्षित यांचा विद्यावाचस्पती पदवी प्राप्त झाल्याबद्दल सन्मान करण्यात येणार आहे. यानंतर वसंतराव आपटे यांचे भारतीय प्रजासत्ताक या विषयावर व्याख्यान होईल. तसेच संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज चैतन्य महाराज देहूकर यांचे कीर्तन होणार आहे. 

दिनांक 16 जानेवारी रोजी सर्वेश कुलकर्णी पुणे, सुरतचे आचार्य चंद्रेश जी यांचे प्रवचन तर चैतन्य महाराज यांचे कीर्तन संपन्न होईल.

दिनांक 17 रोजी पंढरपूरचे राणू महाराज वासकर यांचे प्रवचन तर पाथर्डी चे मुकुंदकाका जाटदेवळेकर यांचे कीर्तन संपन्न होईल.

दिनांक 18 जानेवारी रोजी विद्यावाचस्पती संजय कोटणीस महाराज यांचे प्रवचन तर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे गहनीनाथ महाराज औसेकर यांचे कीर्तन होईल.

17 व 18 जानेवारी रोजी अहिल्यानगर येथील भारतीय संस्कृती सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमाकांत व्यास यांचे 'आपुलिया हिता जो असे जागता' या विषयावर प्रवचन होणार असून दिनांक 19 जानेवारी रोजी डॉक्टर शरद गद्रे यांचे सकाळच्या सत्रात काल्याचे किर्तन तर दुपारी आराधनाचे कीर्तन होईल.

या सर्व भावपूर्ण कार्यक्रमांचा लाभ समस्त सांगलीकर नागरिकांनी घ्यावा असे आवाहन ह. भ. प. गुरुनाथ कोटणीस महाराज व ह. भ. प. संजय कोटणीस महाराज यांनी केले आहे.