yuva MAharashtra दुचाकी चालवताय ? मग सुरक्षित प्रवासासाठी खालील सूचनांचे पालन करा, अपघातापासून दूर राहाल !

दुचाकी चालवताय ? मग सुरक्षित प्रवासासाठी खालील सूचनांचे पालन करा, अपघातापासून दूर राहाल !



फोटो सौजन्य  - shutterstok.com

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २५ जानेवारी २०२५

आजकाल अनेकजण रोजच्या प्रवासासाठी दुचाकीचा वापर करतात. गरीब असो की श्रीमंत प्रत्येकाकडे ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे दुचाकी वाहन असतेच. असे म्हटले जाते की, घरटी किमान दोन किंवा तीन तरी दुचाकी वाहने असतात. राज्यातील दुचाकींचे नक्की संख्या सांगता येणार नसली तरी एका अंदाजानुसार राज्यात दोन ते तीन कोटी दुचाकी वाहने आहेत. त्यामुळे दुचाकी वाहनांचा विस्फोट होत असल्याची चर्चा नेहमीच होत असते. त्यामुळे वाहन चालकाची सुरक्षा ही सर्वात मोठी गोष्ट ठरत आहे. दररोज कुठेतरी दुचाकी वाहनांच्या अपघाताचे बातमी कानावर पडतेच. आणि म्हणूनच खालील सूचनांचे पालन केल्यास, दुचाकी अपघातावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. प्रत्येक दुचाकीस्वाराने किंबहुना सर्वच वाहन चालकाने स्वतःच्या जीवाबरोबरच अन्य वाहन चालकांच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेण्याची गरज सध्याच्या घडीला महत्त्वाची ठरत आहे. 

या पार्श्वभूमीवर, दुचाकी चालवताना सुरक्षिततेकडे लक्ष देणे अतिशय महत्त्वाचे आहे. वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे तुम्ही स्वतःच नाही, तर इतरांचाही जीव धोक्यात घालू शकता. त्यामुळे दुचाकी चालवताना या पाच सवयी अंगीकारा:



1. वेगावर नियंत्रण ठेवा

वेगाने दुचाकी चालवणे हा अपघातांचा मुख्य कारण आहे. जितका वेग जास्त, तितका धोका जास्त. त्यामुळे दुचाकी हळू आणि नियंत्रित वेगात चालवा.

2. वाहनांपासून योग्य अंतर ठेवा

समोरून किंवा बाजूने येणाऱ्या वाहनांपासून पुरेसे अंतर ठेवा. अपघात होण्याची शक्यता मुख्यतः अंतर कमी ठेवण्यामुळे वाढते. नेहमी समोरच्या वाहनापासून किमान ७० मीटर अंतर ठेवा.

3. साइड मिररचा योग्य वापर करा

दुचाकी सुरू करण्यापूर्वी साइड मिरर व्यवस्थित सेट करा. मिररचा योग्य प्रकारे वापर केल्यास मागील वाहनांची हालचाल लक्षात येते आणि तुम्ही सुरक्षित राहता.

4. रस्त्यावर लक्ष केंद्रित करा

दुचाकी चालवताना फोनचा वापर करणे टाळा. ड्रायव्हिंग करताना तुमचे पूर्ण लक्ष रस्त्यावर असावे. रस्त्यावरील खड्डे, ब्रेकर किंवा इतर अडथळ्यांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. कधीही, कुठूनही, कसेही आडवे तिडवे वाहन चालवणा-या बेदरकार तरुणाई ही आपली सर्वात मोठी शत्रू म्हणायला हवी. आपले दुसरे शत्रू म्हणजे भटकी जनावरे... यांच्यापासून बचाव करीत वाहन चालवणे म्हणजे खरोखरच सर्कस असते.

5. सर्वात महत्त्वाचे हेल्मेट

हेल्मेट हे आपले सर्वात मोठे बचाव करणारे शस्त्र आहे. याचा वापर करणे शासनाने अनिवार्य केलेले असले, तरी अजूनही अनेक दुचाकीधारक हेल्मेट घालत नाहीत. हेल्मेट घालणाऱ्या दुचाकी धारकाचा अपघात होत नाही का ? असा त्यांचा सवाल असतो आता यांच्यासमोर काय बोलायचे ?... काही अपघातात हेल्मेट असूनही दुर्घटना घडल्याच्या घटना आहेत. परंतु हेल्मेटमुळे प्राण वाचलेले अनेक दुचाकीधारक आहेत. आपण यांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवूया. कारण कायम सकारात्मक विचार करणे हे सर्वांच्याच फायद्याचे असते

5. मद्यपान करून वाहन चालवणे टाळा

मद्यपान करून गाडी चालवणे हा गंभीर गुन्हा आहे. यामुळे तुम्ही स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालता.

ही पाच सवयी आत्मसात केल्यास तुमचा प्रवास अधिक सुरक्षित होईल आणि अपघात टाळता येतील. वाहन चालवताना नेहमी सावधगिरी बाळगा!