yuva MAharashtra पैल तो गे काऊ कोकताहे ! (✒️ जयंत कुलकर्णी - पुणे)

पैल तो गे काऊ कोकताहे ! (✒️ जयंत कुलकर्णी - पुणे)


| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. ५ नोव्हेंबर २०२
दगड पाण्यात टाकून, पाणी वर आणून, पाणी पिणाऱ्या कावळ्याची गोष्ट आपण वाचली आहे. त्याच्या बुद्धिमत्तेला दाद देणारी अजून एक क्लिप अलीकडेच मी पाहिली.

एका जीवशास्त्रज्ञाने पिस्त्याच्या टरफलामध्ये किडे ठेवून ती टरफले एका झाडाच्या बुंध्याच्या पोकळीत ठेवली. त्या पोकळीच्या वरती झाकण ठेवले. त्या झाकणाला एक बारीक छिद्र ठेवले. मग लवचिक टोके असणाऱ्या काही लाकडी काटक्या त्या बुंध्याजवळ ठेवल्या. त्या जीवशास्त्रज्ञाला कावळ्यांची हुशारी पहायची होती. कावळ्याने लवकरच आपले आवडते अन्न झाडाच्या बुंध्यात असलेले शोधले. लगेच कावळ्याने बाजूला पडलेली काटकी उचलून छिद्रामधून बुंध्याच्या पोकळीत घातली. पण ते किडे त्या आत घातलेल्या काटकीने वर आले नाहीत. मग त्या कावळ्याने आपली हुशारी पणाला लावली आणि आपल्या चोचीने काटकीचे लवचिक टोक वाकवले आणि काटकीचा वाकलेला भाग छिद्रामधून आत सोडला आणि काय आश्चर्य, त्याला झाडाच्या बुंधाच्या ढोलीतील त्याचे अन्न वर काढता आले!

तर असा हा हुशार कावळा! भारतीय कावळ्यांमध्ये गावकावळा आणि डोमकावळा हे दोन मुख्य प्रकार आहेत. गाव कावळ्याच्या काळ्या रंगात किंचित हिरवट, निळसर किंवा जांभळ्या रंगाची झाक असते. मानेभोवती पाठीकडे आणि छातीवर करडा किंवा राखाडी रंग असतो. चोच व पाय मजबूत व काळे असतात. चोच धारदार व बळकट असते. डोळे गडद तपकिरी रंगाचे असून दृष्टी तीक्ष्ण असते. आवाज कर्कश असतो. वसाहती जवळ राहणारा पण घरात न येणारा, सर्वांना परिचित असलेला हा पक्षी. मानवी वस्तीत न बुजता धिटाईने वावरतो. 


हा चलाख, सावध, आणि चपळही आहे. पोपटासारखी याची खाण्याची कौतुके नाहीत. माणसाचे सर्वच खाद्यपदार्थ तो खातो, तसेच त्याज्य पदार्थही खातो. हा मृत भक्षीही आहे. हा सर्वाहारी असल्याने शिजलेले अन्नधान्य, उंदीर, लहान पक्षी, त्याची अंडी, मृत जनावरे, उष्टे, खरकटे, खराब झाल्याने फेकून दिलेले खाद्यपदार्थ, प्राण्यांची मृत शरीरे इत्यादीही खातो. आपला परिसर स्वच्छ राहण्यास त्यांची चांगली मदत होते. अंदाजे ४२ ते ४६ सेंटीमीटरच्या जवळपास लांबीचा हा पक्षी. नर - मादी दोन्ही दिसायला सारखेच असतात. संपूर्ण काळ्या रंगाच्या कावळ्याला डोमकावळा असे म्हणतात. कावळ्याला दोन डोळे असतात, तरीही त्याला एकाक्ष म्हणतात! हा हुशार पक्षी म्हणून ओळखला जातो.

कावळा भारतभर सगळीकडे आढळतो. तसेच भारताच्या आजूबाजूच्या देशातही आढळतो. कावळ्याच्या अनेक जाती असून दक्षिण अमेरिकेचा अपवाद वगळता जगात सर्वत्र कावळे दिसून येतात. साधारण एप्रिल ते जून हा कावळ्यांच्या विणीचा काळ आहे. उभ्या पिकातील धान्य आणि वाळविण्यासाठी ठेवलेल्या पदार्थांची कावळे नासाडी करतात. सातत्याने टेहेळणी करून संधी मिळताच धिटाईने खाद्यपदार्थ पळविण्यात कावळे तरबेज असतात. त्यांच्या नजरेतून सहसा काही सुटत नाही. प्रसंगी घारी - घुबडांसारख्या बलवान शत्रूंवरही कावळे धीटपणे हल्ला करतात. कुरापती काढण्यात कावळे पटाईत असतात. कुत्र्या मांजरांनाही ते सताऊन हैराण करतात. बेडकांना टोचून टोचून ठार मारतात.

कावळा उंच झाडांवरील फांद्यांच्या बेचक्यात काटक्यांचे व मिळेल ते इतर साहित्य वापरून घरटे तयार करतो. घरट्यातील खोलगट भागात लोकर, चिंध्या अथवा काथ्याचे अस्तर असते. कावळी एकावेळी चार-पाच अंडी देते. नर मादी मिळून पिलांचे संगोपन करतात. कित्येकदा कावळ्याच्या घरट्यात कोकिळा आपली अंडी सोडून निघून जाते. कावळा व कावळी दोघेही कोकिळेची अंडी उबवून तिच्या पिलांना आपलीच समजून वाढवीत असतात ! कोकिळेच्या पिलांची वाढ वेगाने होते. त्यामुळे कावळ्याची पिले पूर्ण वाढण्याअगोदर कोकिळेची पिले सक्षम होऊन निघूनही जातात. 

पक्षांमध्ये कावळा हा सर्वात बुद्धिवान आणि सावध समजला जातो. ते गटागटाने राहतात. रात्री एखाद्या मोठ्या झाडावर त्यांचा मुक्काम असतो. संध्याकाळी ते एकत्र आले की काव काव करत खूप गोंधळ घालतात. कीटक, उंदीर व घुशिंसारख्या लहान कुरतडणाऱ्या प्राण्यांच्या संख्येवर ते नियंत्रण ठेवतात. शेतीत वापरली जाणारी विषारी किटकनाशक द्रव्य खाऊन कीटक उंदीर आणि सरपटणारे प्राणी मरतात. हे प्राणी कावळ्यांच्या खाण्यात आले की कावळे देखील मृत्युमुखी पडतात किंवा जगले तरी प्रजनन करू शकत नाहीत. त्यामुळे कावळ्यांची संख्या उत्तरोत्तर कमी होत आहे. कावळा सुमारे वीस ते तीस वर्षे जगतो. कावळे त्यांच्या समस्या सोडवण्याच्या कौशल्यांसाठी लोकप्रिय आहेत. शिवाय त्यांच्या आश्चर्यकारक संभाषण कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत.

हिंदू संस्कृतीत माणसाच्या मृत्यूनंतर दिवसकार्यात व प्रत्येक श्राद्धाच्या वेळेस कावळ्याला जेवण देण्याची प्रथा आहे. तसेच रोजच्या अन्नातील एक घास कावळ्यांसाठी काढून ठेवण्याचीही प्रथा आहे. या प्रथेस काकबली म्हणतात. अपुरी इच्छा अगर वासना मागे ठेवून एखादी व्यक्ती गेल्यास कावळा पिंडाला शिवत नाही. ती इच्छा पूर्ण करण्याचे वचन नातेवाईकाने दिले की, कावळा पिंडाला शिवतो अशी मान्यता आहे. पिंडाला काकस्पर्श झाल्यास पूर्वजांनी आपण ठेवलेल्या अन्नाचे ग्रहण केले असे मानले जाते. भाद्रपद महिन्यातील वद्यपक्ष पितर व पूर्वजांसाठी समर्पित करण्यात आला आहे. श्रद्धापूर्वक श्रद्धांजली, पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पितृपक्ष पंधरवड्यात पूर्वजांच्या नावाने श्राद्धतर्पणविधी करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. पितृपक्षात प्राणी, पक्षी, अतिथी, पाहुणे यांचा अपमान करू नये असे म्हटले जाते. तसेच या कालावधीत कावळा आणि गाईला दिलेले अन्न विशेष मानले गेले आहे.

माणसांना फक्त उजेडात दिसते मांजराला उजेडात व अंधारातही दिसते वटवाघुळ व घुबडास फक्त अंधारातच दिसते अशी निरनिराळी दृष्टी परमेश्वराने दिली आहे. तशी त्या पिंडातील जीवात्मा दिसण्याची दृष्टी परमेश्वराने कावळ्यास दिली आहे. आपली इच्छा पूर्ण होण्याची आश्वासने मिळेपर्यंत तो जीवात्मा कावळ्याला शिवू देत नाही. कावळे जवळ येतात पण उडून जातात. मृत व्यक्ती कावळ्याच्या रूपाने येऊन पिंडाला स्पर्श करते अशी अनेकांची समजूत आहे, पण प्रत्यक्षात तसे नसून तो जीवात्मा इच्छापूर्तीचे वचन मिळेपर्यंत कावळ्यास मज्जाव करतो. पिंडाला कावळा का शिवला पाहिजे, तर कावळ्यास ही दृष्टी आहे म्हणून. तशी दृष्टी परमेश्वराने फक्त कावळ्यासच दिली आहे! जीवात्मा हा वायुरूप असतो. तर कावळा तीक्ष्ण नजरेचा असतो. वासना राहिल्यास दहा दिवसापर्यंत सूक्ष्म देह असतो, तो पिंडा भोवती फिरतो. कावळ्यास तो दिसल्याने काकस्पर्श होत नाही. इच्छापूर्तीचे आश्वासन मिळाले की सूक्ष्म देह निघून जातो. हालचाल नाही म्हणून काक पिंडास स्पर्श करतो. असे या विषयातील तज्ञांचे मत आहे.

एका पुराण कथेनुसार इंद्रपुत्र जयंत यांनी सर्वप्रथम कावळ्याचे रूप धारण करत सीता देवीच्या पायाला चोच मारली. कावळ्याची कृती पाहून श्रीरामांनी गवताच्या काडीचा वापर करत ब्रह्मास्त्र चालवले आणि जयंतचा डोळा क्षतीग्रस्त केला. (कदाचित त्यामुळेच कावळ्याला एकाक्ष म्हणत असावेत!) तेव्हा जयंतने श्रीरामाकडे क्षमा याचना केली. मर्यादा पुरुषोत्तमाने जयंतला क्षमा करून वरदान दिले की कावळा रुपी तुला अर्पण केलेले भोजन पूर्वजांना लाभेल. घराच्या खिडकीवर किंवा दारावर येऊन कावळा ओरडू लागला की पाहुणे येणार असल्याचे संकेत मिळतात, अशी लोकमान्यता रूढ आहे. तसेच घराच्या खिडकीवर किंवा दारावर कावळ्याने केलेली विशिष्ट कृती पूर्वजांचे आशीर्वाद मानली जाते. कावळा चोचीत फुल - पाने घेऊन आला तर तो शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत! कावळा गायीच्या पाठीवर चोच घासताना दिसल्यास धन धान्याची कमतरता भासणार नाही असा संकेत असल्याचे सांगितले जाते. कावळा आपल्याच चोचीत गवताची काडी घेऊन आल्यास भविष्यकाळात उत्तम धनलाभ होण्याचे योग असतात, अशीही लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. 

कावळा हा वैवस्वत कुळात जन्माला आला आहे. जोपर्यंत वैवस्वत मन्वंतर आहे, तोपर्यंत कावळा हा यमराजाचा द्वारपाल आहे. म्हणून पिंडाला काकस्पर्श झाला म्हणजे मृतात्म्यास यमद्वारी प्रवेश मिळेल असे श्रीरामांनी कावळ्याला वरदान दिले आहे. म्हणून कावळ्याला दररोज अन्न दिल्याने कावळा अन्न रुपाने पापाचे भक्षण करतो व श्राद्धात अन्न दिल्याने यमलोकी पितरांना त्रास होत नाही. म्हणून कावळ्याला अन्न किंवा पिंड देतात.

"पैल तो गे काऊ कोकताहे" ही संत ज्ञानेश्वरांची रचना सुप्रसिद्ध आहे. व्यंकटेश स्तोत्रात "काकविष्ठेचे झाले पिंपळ" असे म्हटले आहे. कारण पिंपळ, वड या सारख्या झाडांची फळे कावळे खातात. कावळ्यांच्या विष्ठेतून या झाडांच्या बिया ठिकठिकाणी पडतात आणि रुजतात. ज्यामुळे नैसर्गिकरित्या वनीकरण होते. अशा पद्धतीने वनीकरणाचे मोठे काम कावळे करत असतात. आपण फक्त वृक्षतोड केली नाही की झाले!

"कावळा म्हणे मी काळा पांढरा शुभ्र तो बगळा"ही कविता आपल्याला शालेय अभ्यासक्रमात होती. जवळपास कुठे, कधी एखाद्या नवीन इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी कावळे वेळी - अवेळी, दिवसा - रात्री, अपरात्री, केव्हाही मोठ्या संख्येने मोठ्या कर्कश आवाजात "कावकाव" करताना आढळले की मला नेहेमी असे मनापासून वाटते की, इमारतीच्या बांधकामासाठी त्या ठिकाणची झाडे तोडली असण्याची शक्यता आहे, ज्या झाडांवर त्यांची घरटी होती. जणू काही त्यांची घरटी उद्ध्वस्त झाल्याचा निषेधच ते नोंदवत आहेत! कारण ते कुरापती काढण्यात पटाईत आहेत, समस्या सोडवण्याच्या कौशल्यासाठी लोकप्रिय आहेत आणि त्यांचे संभाषण चातुर्य प्रसिद्ध आहे!
------------*------------*समाप्त*------------*------------

जयंत शंकर कुलकर्णी 
डी - ७०५, मधुकोष अपार्टमेंट, सिंहगड रोड, 
धायरी फाटा, भगवती पॅलेस जवळ,
पुणे - ४११०६८
मोबाईल क्रमांक : ९४२३५३४१५६
मेल आयडी : jvapkulkarni@gmail.com 
------------------------------*-------------------------------