Sangli Samachar

The Janshakti News

कर्मवीर पतसंस्था व कर्मवीर ट्रस्टचे 'कर्मवीर भूषण' पुरस्कार जाहीर; डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान - रावसाहेब पाटील


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ सप्टेंबर २०२४
सांगली येथील प्रथितयश कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था व कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने, प्रतिवर्षी निरनिराळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना कर्मवीर भूषण पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदाचे कर्मवीर कृषी भूषण पुरस्कार, कर्मवीर विद्या भूषण पुरस्कार, कर्मवीर उद्योग भूषण पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील व कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. ए. के. चौगुले (नाना) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यंदाचे पुरस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये, कर्मवीर कृषी भूषण पुरस्कार - आ. डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, संस्थापक शरद शैक्षणिक व उद्योग समूह. कर्मवीर विद्याभूषण पुरस्कार - डॉ. प्रा. डी. डी. चौगुले, संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी, कर्मवीर उद्योग भूषण पुरस्कार - श्री योगेश लक्ष्मण राजहंस, सुप्रसिद्ध उद्योजक सांगली. यांना देण्यात येणार आहेत. पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ मानचिन्ह व रोख 51 हजार रुपये असे आहे. अशी माहिती यावेळी श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी दिली.

रविवार दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता, ऐश्वर्या मल्टीपर्पज हॉल धामणी-कोल्हापूर रोड, ए बी पाटील इंग्लिश स्कूल जवळ येथे संपन्न होणाऱ्या एका भव्य समारंभात हे पुरस्कार, ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ भारतीय अणुऊर्जा महामंडळाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या शुभहस्ते व भारतीय अभिमत विद्यापीठ पुण्याचे कुलपती मा. प्रा. डॉ. शिवाजीराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमास टेक्नॉलॉजी ट्रान्सफर अँड कोलॅब्रेशन 'बीएआरसी' चे माजी प्रमुख डॉ. अजित एम पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या समारंभ निमित्त हॉलच्या परिसरात विविध कॉलेजेसच्या वतीने मॉडेल प्रदर्शनाचे आयोजन हे करण्यात आले आहे या कार्यक्रमांमध्ये सर्व शाळा व कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनीनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी यावेळी केले. 

कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था याची स्थापना कर्मवीर जयंती सुवर्ण व महोत्सवी वर्षानिमित्त 12 मार्च 1987 रोजी सांगलीतील सुप्रसिद्ध डॉक्टर स्व. आप्पासाहेब चोपडे व त्यांच्या सहकार्याने केली. सध्या या पतसंस्थेचे सारथ्य श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील हे करीत असून सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात एक विश्वासाह पतसंस्था म्हणून संस्थेचा नावलौकिक आहे. संस्थेस आर्थिक व सामाजिक क्षेत्रात उत्त बद्दल तब्बल 18 वेळा आदर्श पतसंस्था म्हणून विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

संस्थेने आर्थिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यातही सतत भरीव योगदान दिले आहे. प्रतिवर्षी विद्यार्थ्यांचा सत्कार, गुणवंतांचा सत्कार, रक्तदान शिबिर असे कार्यक्रम संस्थेमार्फत राबविले जातात. तसेच विद्यार्थी खेळाडू, अनाथाश्रम, वृद्धाश्रम यांना मदत, अपंग पुनर्वसन व वृक्षारोपण, सामाजिक विषयावर व्याख्यान यांचे आयोजन, यासाठी संस्थेने नेहमीच मोलाची मदत करण्यात येते. नैसर्गिक आपत्ती वेळी कर्मवीर पतसंस्था व कर्मवीर चारिटेबल ट्रस्टने सगळ हाताने मदत केली आहे.

संस्थेचे कार्यक्षेत्र सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्हा असून, विश्वासार्ह व नावाजलेल्या संस्थेमध्ये या संस्थेची गणना होते. संस्थेच्या एकूण ठेवी 1145 कोटी आहेत. संस्थेने 845 कोटीचे कर्ज वाटप केले असून, वसूल भाग भांडवल 38 कोटी 50 लाख रुपये आहे. तर संस्थेचा स्वनिधी 115 कोटी 26 लाख इतका आहे. संस्था भक्कम आर्थिक पायावर उभे असून संस्थेने 398 कोटी 47 लाख इतकी सुरक्षित गुंतवणूक केली आहे. 

संस्थेस सतत ऑडिट वर्ग मिळत असून, सभासदांच्या हितासाठी संस्थेने ठेवी व कर्जाच्या विविध योजना राबविल्या आहेत. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात 64 शाखांच्या माध्यमातून संस्था कार्यरत आहेत सर्व शाखा ऑनलाईन कोअर बँकिंगने जोडलेले आहेत. एसएमएस बँकिंग RTGS/NEFT/IMPS व लॉकर सुविधा देण्यात येत आहेत.

या पत्रकार बैठकीस कर्मवीर चारिटेबल ट्रस्टचे कार्यवाह व तज्ञ संचालक श्री लालासो भाऊसो थोटे, संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक अण्णा सकळे, संचालक ॲड. एस पी मगदूम, डॉ. रमेश वसंतराव ढबू, श्री. वसंतराव धुळाप्पांना नवले, डॉ. एस बी पाटील (मोटके), डॉ. चेतन आप्पासो पाटील, संचारिका श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे, सौ चंदन नरेंद्र केटकाळे, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदूम आदी मान्यवर उपस्थित होते.

पद्मविभूषण डॉ. अनिल पुरुषोत्तम काकोडकर यांचा अल्पपरिचय

पूर्ण नाव :- अनिल पुरुषोत्तम काकोडकर
जन्म :-११ नोव्हेंबर, १९४३ (वय: ८०) बारावनी, मध्य प्रदेश, भारत
कार्यसंस्था :- भाभा अणुसंशोधन केंद्र
प्रशिक्षण :-व्ही.जे.टी.आय.
वडील :- पुरुषोत्तम काकोडकर
आई :- कमला काकोडकर

डॉ. अनिल काकोडकर (जन्म: बारावनी, मध्य प्रदेश, भारत, ११ नोव्हेंबर १९४३) हे भारताच्या सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे अध्यक्ष आणि भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे प्रमुख अधिकारी आहेत. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाच्या प्रमुखपदाच्या आधी ते इ.स. १९९६ ते २००० च्या दरम्यान, होमी भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक होते.

भारतीय स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक

भारताच्या अनेक महत्त्वाची वैज्ञानिक पदे सांभाळणारे व अणुचाचणीतील मुख्य शास्त्रज्ञ होण्याव्यतिरिक्त, डॉ. काकोडकर हे थोरियम या इंधनावर आधारित अणुऊर्जेच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक म्हणूनही ओळखले जातात.

वाटचाल

डॉ. काकोडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील बारावनी गावात झाला. त्याच्या मातोश्री श्रीमती कमला काकोडकर आणि वडील पुरुषोत्तम काकोडकर हे गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण स्थानिक शाळेत, तर माध्यमिक शिक्षण खारगाव येथे झाले. मॅट्रिकनंतर ते मुंबई येथे शिक्षणासाठी आले.

डॉ. काकोडकर हे मुंबईच्या रुपारेल कॉलेज मध्ये बारावीपर्यंत होते. त्यानंतर त्यांनी यंत्रशास्त्रीय (मेकॅनिकल) तंत्रज्ञानाची पदवी व्ही.जे.टी.आय., मुंबई विद्यापीठ येथून १९६३मध्ये मिळवली. भाभा अणुसंशोधन केंद्रात ते १९६४ साली रुजू झाले. पुढे त्यांनी नॉटिंगहॅम विद्यापीठातून १९६९ साली पदव्युत्तर पदवी मिळवली.

पुढे त्यांनी भाभा संशोधन केंद्रात प्रक्रिया अभियांत्रिकी (रिअॅक्टर इंजिनियरिंग) विभागात बनणाऱ्या "ध्रुव रिॲक्टर "मध्ये, पूर्णतया नवीन आणि उच्च तंत्रज्ञान वापरून मोलाची भर टाकली. ते भारताच्या १९७४ आणि १९९८ च्या अणुचाचणीच्या मुख्य चमूचे सभासद होते. पुढे त्यांनी भारताच्या स्वयंपूर्ण अशा जड पाण्याच्या रिॲक्टरच्या चमूचे नेतृत्व केले. कल्पकम आणि रावतभट्ट या जवळजवळ मोडकळीस आलेल्या अणुभट्ट्यांचे पुनरुज्जीवन हे त्यांच्या तांत्रिक कौशल्याचे महत्त्वाचे उदाहरण आहे.

आतापर्यंत त्यांनी जवळजवळ २५० च्यावर शास्त्रीय संशोधनपर लेख लिहिले आहेत.
ऊर्जा आणि भारताचा शांततामय अणुऊर्जा कार्यक्रम
भारताला ऊर्जाक्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी, थोरियमसारख्या स्वस्त आणि भारतात सहज उपलब्ध अशा स्रोतापासून ऊर्जा बनवण्याचे स्वप्न काकोडकर यांनी पाहिले आणि त्या दिशेने बरीच ठोस प्रगती केली आहे. सध्या ते प्रगत अशा जड पाण्याच्या भट्टीवर काम करत आहेत. ह्या भट्टीत थोरियम-युरेनिअम २३३ याचा मूळ ऊर्जास्रोत म्हणून वापर होईल, तर प्लुटोनियम केवळ सुरुवातीचे ऊर्जापूरक इंधन म्हणून वापरले जाईल. अशा प्रकारच्या भट्टीमुळे, भारताची ७५% ऊर्जेची गरज तर दूर होईलच पण एक ऊर्जा मिळवण्याचा सोपा आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध होईल.

इतर पदे

डॉ. काकोडकर (सन २०११) "भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई" (भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई) याचे अध्यक्ष होते.
राष्ट्रीय तंत्रज्ञान अकादमीचे (इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनियरिंग) ते १९९९-२००० या दरम्यान अध्यक्ष होते.
ते जागतिक अणुऊर्जा महामंडळाचे सभासद आहेत. तसेच त्यांना जागतिक नवतंत्रज्ञान संस्थेने मानाचे सभासदत्व दिले आहे.
ते न्यूक्लियर्स सप्लाय ग्रुप (एन.एस.जी. ग्रुप) चे १९९९ ते २००२ या दरम्यान सभासद होते.
वयम् ह्या किशोरवयीन मुलांसाठीच्या दर्जेदार मराठी वाचन साहित्याच्या सल्लागार मंडळातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे.

पुस्तके

सूर्यकोटि समप्रभ - द्रष्टा अणुयात्रिक- डॉ. अनिल काकोडकर (लेखिका अनिता पाटील)
अणुविश्वातील ध्रुव डॉ. अनिल काकोडकर- नीरज पंडित
विज्ञानयात्री - डॉ अनिल काकोडकर, लेखक अ. पां. देशपांडे, श्रीराम मनोहर, प्रकाशक - राजहंस प्रकाशन. पृष्ठे - ७६.
अणुविश्वातील 'ध्रुव' डॉ. अनिल काकोडकर, लेखक नीरज पंडित, प्रकाशक- रोहन प्रकाशन, पृष्ठे - १०७.

राष्ट्रीय पुरस्कार

पद्मश्री (१९९८)
पद्मभूषण १९९९
पद्मविभूषण (२००९)

राज्य पुरस्कार

गोमांत विभूषण पुरस्कार (२०१०), गोवा राज्य
महाराष्ट्र भूषण पुरस्कार (२०११-१२), महाराष्ट्र राज्य
मध्यप्रदेश गौरव पुरस्कार (२०१४), मध्यप्रदेश राज्य |

इतर पुरस्कार

हरी ओम आश्रम प्रेरित विक्रम साराभाई पुरस्कार (१९८८)
एच. के. फिरोदिया पुरस्काः (१९९७)
रॉकवेल पदक (१९९७)
फिक्की पुरस्कार, त्यांच्या अणुऊर्जा आणि तंत्रज्ञानाच्या योगदानाबद्दल (१९९७-९८)
अनकॉन जीवनगौरव पुरस्कार (१९९८)
एच. जे भाभा स्मृतिपुरस्कार (१९९९-२०००)
गोदावरी गौरव पुरस्कार (२०००)