| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - दि. १९ सप्टेंबर २०२४
माणूस, मग तो स्त्री, पुरूष कुणीही असो, त्याचा-तिचा धर्म, जात, पंथ कोणताही असो, तो-ती नास्तिक असो किंवा आस्तिक असो, आईच्या उदरातून नुकतेच जन्मलेले बालक असो किंवा शेवटचे कांही श्वास घेणारा-घेणारी वृद्ध-वृद्धा असो, कोणताही व्यवसाय-नोकरी करणारा असो, पृथ्वीच्या कोणत्याही भागात राहणारा असो, त्याची एक आणि फक्त एकच इच्छा असते, आपल्या जीवनामध्ये दुःख, वेदना, त्रास नसावा सदैव, सर्वकाळ सुख, आनंद आणि फक्त सुख, आनंदच असावे.
वास्तविकपणे पाहता सर्वसामान्य माणसांचे जीवन एका आखलेल्या चाकोरीतून दररोज उगवणाऱ्या व मावळणा-या सूर्यनारायणाप्रमाणे सरळ रेषमध्ये फारशी उलथापालथ न होता पुढे-पुढे सरकत असते. पण जसे काळे ढग कधी-कधी सुर्याला झाकाळून टाकतात, राहु-केतु कांही काळासाठी त्याला कधी अर्धवट तर कधी पूर्ण गिळंकृत करतात, त्याप्रमाणे सामान्य माणसांच्या जीवनातही कधीतरी कांही तरी घडते. पुढेपुढे सरकत असलेली त्यांच्या जीवनाची सरळ रेषा कुठेतरी अडखळते, वेडीवाकडी वळणे घेते. अशावेळी माणसांचे मन त्रास, चिंता, नैराश्य, वेदना, दुःखाने ग्रासुन जाते, जे त्यांना नको असते, कारण त्यांना हवे असते सुख, आनंद. पण सुख, आनंद तात्काळ किंवा अपेक्षित वेळेत मिळत नाही. अशा वेळी कांही जन त्या दुःखाला, दुःखाच्या कारणाला धैर्याने सामोरी जातात, तर कांही जन मनांतून तुटून जातात आणि हताशपणे 'ऺजगी सर्व सुखी असा कोण आहे' असा विचार (?) करून मनाची कशीतरी समजूत घालतात व नैराश्य, उदास जीवन जगत (?) कसेबसे दिवस कंठतात.
इथं एक बाब समजावून घेणं महत्वाचे आहे. श्री समर्थ रामदासस्वामीकृत श्री मनाच्या श्लोकांतील ११ श्लोकाच्या पहिल्या ओळीचा पुर्वाध ऺजगी सर्व सुखी असा कोण आहे ?' याचा अर्थ या जगात कोणीही सुखी नाही' असा कांही जण घेतात ते योग्य नाही. कारण स्वामींनी ऺजगी सर्व सुखी असा कोण आहे' असे विधान केलेले नाही तर प्रश्न उपस्थित केला आहे. हे 'विचारें मना तूंचि शोधूनि पाहे', म्हणजे मनाला याचा शोध घेण्यास सांगा या त्या ओळीच्या उत्तरार्धातून ध्यानात येते.
श्री समर्थ रामदासस्वामीकृत श्री मनाच्या या ११ श्लोकावर चिंतन, मनन केले असता, हे लक्षांत येते की श्री स्वामींनी मनुष्याला त्याच्या जीवनात सुखाची, किंवा दुःखाची प्राप्त कशामुळे होते हे स्पष्ट केले आहे. या श्लोकाचा भावार्थ अधिक स्पष्टपणे समजण्यासाठी त्यावर थोडा विचार करूया.
या श्लोकाच्या सुरवातीच्या ओळीतील 'सर्व सुखी व विचारे मना' हे शब्द खुप महत्वाचे आहेत. कोणतीही व्यक्ति ऺसर्व सुखी' म्हणजे सर्व वेळ, आजच्या आधुनिक भाषेत बोलायचे तर, '२४ x ७' सुखी असणे. पण हे शक्य आहे कां ? नाही. कारण प्रत्येक नाण्याला ज्याप्रमाणे दोन बाजू असतात, त्याप्रमाणे कुणाही जीवंत मनुष्याच्या एकाच मनात सुख किंवा दुःख हे दोन विचार असतात. इथं एक महत्वाची बाब लक्षांत घेणं जरूरीचे आहे आणि ती म्हणजे रात्र आहे म्हणून दिवस म्हणजे काय आहे हे समजते. उन्हं आहेत म्हणून सावली म्हणजे काय हे समजते, वाईट आहे म्हणून चांगले म्हणजे काय हे समजते, त्याप्रमाणे दुःख आहे म्हणून सुख म्हणजे काय हे समजते. जर दुःखच नसेल तर सुख कशाला म्हणतात हे कसे समजेल ? जन्मांध व्यक्तिंच्या डोळ्यांना प्रकाश म्हणजे काय हे कसे समजेल? त्यामुळे सुख आणि दुःख हे मनुष्याच्या एकाच मनाच्या एकमेकांच्या अस्तित्वावर अवलंबून असणाऱ्या दोन भावना, दोन विचार आहेत.
या वरून हे स्पष्ट होते की जो पर्यंत जीवन आहे तो पर्यंत कांही काळ हा सुखाचा असणार तर कांही काळ दुःखाचा असणार. त्यामुळे आपण सर्व काळ सुखात, आनंदात असावे अशी जरी मनुष्याची इच्छा असली तरी ते शक्य नाही हे सत्य आहे. हे सत्य श्री स्वामींना ज्ञात असल्यांने ते सांगतात, ऺजनीं सर्व सुखी असा कोण आहे'। ऺविचारें मना तूंचि शोधूनि पाहेंʼ, हे विचार करणाऱ्या मना तू शोध घे, या जगात सर्व सुखी असा कुणी असणे शक्य आहे कां? अर्थातच असा कुणीही नाही. प्रत्येक व्यक्तिच्या जीवनात कांही काळ हा सुखाचा असेल, तर कांही काळ हा दुःखाचा असेल.
त्यामुळे प्रत्येकांने आपण सदा सुखी असावे, त्यामध्यें कधीही दुःख, नसावे अशी इच्छा, विचार करण्यापेक्षा दैनंदिन जीवनामध्ये, रोजचे व्यवहार करतांना आपण जास्तीतजास्त काळ सुखात, आनंदात कसे राहू हे जाणून घेणे गरजेचे आहे. प्रत्येक माणसाच्या या अत्यावश्यक गरजेचे समाधान श्री समर्थांनी या श्लोकात 'मना त्वांचि रे पूर्व संचीत केलें । तया सारिखे भोगणें प्राप्त झाले।।' असे सांगून मनुष्याला सुख किंवा दुःख कशामुळे प्राप्त होते हे स्पष्ट केले आहे.
श्लोकाच्या पहिल्या ओळीतील ऺसर्व सुखी व विचारें मना तूंचि शोधूनि पाहे'ऺ यांचे अर्थ जसे महत्वाचे आहेत, तसेच श्लोकाच्या दुस-या ओळीतील ऺपूर्व संचीत' व 'तया सारिखे भोगणे' यांचे अर्थही महत्वाचे असून ते समजण्यासाठी त्यावर चिंतन, मनन करणे आवश्यक आहे.
पूर्व संचिताचा अर्थ कांही लोक वर्तमान व पूर्वीच्या जन्मांमध्ये केलेल्या कर्मांशी म्हणजे कृत्यांशी जोडून वर्तमान जीवनात वाट्याला आलेले सुख-दुःख त्यांचा परिणाम आहे असे समजतात. पण पूर्व संचिताचा अर्थ फक्त वरवर दिसणाऱ्या बाह्य कर्मांपुरता मर्यादित नाही तर प्रत्येक कर्म किंवा अकर्मामागे जे विचार आहेत, जे विचार मनांमध्ये साठले गेले आहेत, ज्या विचारांचा संचय मनामध्ये आहे ते सर्व, असा व्यापक आहे.
परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्याने किंवा अनुत्तीर्ण झाल्याने वैफल्यग्रस्त, आत्महत्या करणारा विद्यार्थी, परक्या जाती-धर्मातील मुलाशी-मुलीशी विवाह केला या कारणाने मुला-मुलीशी अबोला धरणारे, नाते तोडणारे आई-वडिल, संपत्तीसाठी कोर्टाची पायरी चढणारे भाऊ-बहिण, एकमेकांशी पटत नसल्यांने मतभेद, वादावादी, भांडणे करणाऱ्या सासू-सुना, आई-वडिल, मुले-मुली, परस्परांना घटस्फोट देऊन विभक्त होणारे पती-पत्नी ..... ही व अशी अनेक उदाहरणे मनुष्यांच्या जीवनातील सुख-दुःखाशी निगडीत असतात.
समाजामध्ये नेहमी आढळणाऱ्या अशा घटनां मागील कारणांचा सूक्ष्म अभ्यास केला, त्यांची मिमांसा केली, त्यांचे पृथ्थकरण केले तर, हे समजून येते की अशा घटनांमागे वरवर दिसणारी हजारो कारणे जरी असली तरी, त्यांचे मूळ मनामध्ये साठलेले हेवा, असुया, लोभ, अहंकार, तुलना, काम, क्रोध, नैराश्य, तिरस्कार, राग, संताप, संशय, घृणा, ईर्ष्या, असंयमता, क्रुरता, धर्म-जात, उच्च-निचता या बाबतचे विचार आहेत, जे मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यातून साठलेले असतात आणि प्रसंगानुरूप बाह्य घटनांच्या माध्यमातून दृश्य स्वरूपात प्रगट होतात.
या सर्व विवेचनावरून हे समजून येते की, वरवर दिसणारी बाह्य कृत्ये, अकृत्ये, कारणे, परिस्थिती कांहीही असली, कशीही असली तरी मनुष्याला सुख, आनंदाची किंवा दुःख, वेदनांची प्राप्ती त्याच्या मनातील विचारांप्रमाणे होत असते. मुख्य म्हणजे मनुष्याचे मन चंचल आहे. त्यामध्ये योग्य-अयोग्य, चुकीचे-बरोबर विचार सदैव उत्पन्न होत असतात, ज्यांच्या परिणामी तो सदासर्वकाळ सुखी, आनंदी राहु शकत नाही. त्यामुळे मनुष्याला जरी सदासर्वकाळ सुखी, आनंदी राहता येत नसले तरी, आपल्या विचारांना व त्यावर आधारीत कृत्य, क्रिया, अकर्मला योग्य दिशा देऊन त्याला जीवनातील जास्तीतजास्त काळ सुखात, आनंदात राहणे, त्यांचा भोग घेणे शक्य आहे.
स्वांत-सुखायची ही आजची ही कथा इथे पूर्ण.