Sangli Samachar

The Janshakti News

मराठ्यांनी आरक्षण मागणी म्हणजे गरुडाने विमान प्रशिक्षण घेण्यासारखे - भिडे गुरुजी


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ ऑगस्ट २०२४
संभाजीराव भिडे गुरुजी म्हणजे एक कट्टर हिंदुत्ववादी व्यक्तिमत्व. हिंदुत्वाची पाठराखण करताना त्यांनी अनेक वेळा वाद अंगावर घेतले आहेत. मध्यंतरी त्यांच्या गाडीवर हल्लाही झाला होता. परंतु भिडे गुरुजी कधीही आपले विधान मागे घेत नाहीत. किंबहुना ते त्यावर ठाम असतात. आणि याचसाठी अवघी तरुणाई त्यांच्या पाठीशी असते. 


सांगलीत आज सकाळी बांगला देशातील हिंसाचारा विरोधात आपली भूमिका मांडण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, पत्रकारांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाबाबत प्रश्न विचारताच, भिडे गुरुजी यांनी आपल्या खास शैलीत पत्रकारांना उत्तर दिले. 'मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे.
 पण ट्रेनिंग कॅम्प मध्ये निशुल्क प्रवेश दिला म्हणून वाघ सिंह यांनी तिथे प्रवेश घ्यावा का ? विमान उडवण्याच्या प्रशिक्षणासाठी गरुडाने प्रवेश घ्यावा का ? स्विमिंग क्लबमध्ये मासे प्रवेश घेतील का ? अशाच पद्धतीने मराठ्यांनी आरक्षण मागावे का ? हा प्रश्न उभा राहतो. मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कसले मागता ? सिंहांनी जंगल सांभाळायचे असते. मराठा जात ही सबंध देशाचा संसार चालवणारी जात आहे. हे मराठ्यांच्या ज्या दिवशी लक्षात येईल त्या दिवशी या मातृभूमीचे भाग्य उजळून निघेल. मात्र हे त्यांच्या लक्षात येत नाही हे आपले दुर्दैव आहे', अशी खणखणीत प्रतिक्रिया संभाजीराव भिडे गुरुजी यांनी दिली.

दरम्यान बांगलादेश मधील हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या निषेधार्थ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने 25 ऑगस्ट रोजी सांगलीत कडकडीत बंद ठेवणार असल्याची भूमिका भिडे गुरुजी जाहीर केली. बांगलादेशामधील नंगानाच तात्काळ थांबला पाहिजे, यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यायला हवा असे मत भिडे गुरुजींनी यावेळी व्यक्त केले.