Sangli Samachar

The Janshakti News

पैरा फेडण्यासाठी विशाल दादा महाआघाडी विरोधात उभे ठाकणार का ? जिल्ह्यात चर्चा !


| सांगली समाचार वृत्त |
आटपाडी - दि. १८ ऑगस्ट २०२४
लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांनी बंडाचा झेंडा हातात घेऊन महाआघाडीच्या पै. चंद्रहार पाटील यांचा पराभव केला होता. यावेळी त्यांच्या पाठीशी काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी आपली ताकद लावली होती हे लपून राहिले नाही. इतकेच नव्हे तर काँग्रेस पक्षानेही त्यांच्यावर कारवाई करण्याचे टाळले होते. (आजही विशाल पाटील हे काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.) परंतु डॉ. कदम यांच्याप्रमाणेच विशाल पाटील यांच्या विजयात अनेक नेत्यांचा सहभाग होता. आता या विजयाचा पैरा फेडण्याची नैतिक जबाबदारी विशाल पाटील यांच्यावर येऊन पडली आहे. पण प्रश्न हा आहे, हा पैरा फेडत असताना, ज्या काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर कारवाई करण्याचे टाळले, त्या पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाविरोधात विशाल पाटील उभे ठाकणार का ?

हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण म्हणजे, आटपाडी येथील बाजार समितीच्या कार्यक्रमात बोलताना, विशाल पाटील यांनी शिंदे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत बाबर गटाने विशाल पाटील यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्नाचा संदर्भ खा. विशाल पाटील यांच्या ताज्या विधानामागे आहे. यावेळी बोलताना त्यांनी "आम्ही कोणाला घाबरत नाही, आम्ही शब्द शोधून आलेलो आहोत. जिथे आमच्यावर प्रेम आहे तेथे आम्ही प्रेम देतो. त्यामुळे आम्ही ताकतीने तुमच्या पाठीशी ठाम उभे राहणार आहोत." अशी ग्वाहीच सुहास बाबर यांना दिल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे. 


खानापूर आटपाडी मतदारसंघात ठाकरे गटाचे पै. चंद्रहार पाटील यांनी 'पक्षाने आपल्याला आदेश दिला तर ताकदीने मैदानात उतरू' असे म्हटले आहे. त्याने नवी दिल्ली येथे उद्धव ठाकरे यांचे भेट घेतल्याची चर्चा आहे. ज्यावेळी पै. चंद्रहार पाटील उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले होते त्याच दरम्यान, उद्धव ठाकरे यांना खा. विशालदादा पाटील व आ. डॉ. विश्वजीत कदम लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आलेली कटुता कमी करण्याच्या उद्देशाने भेटले होते. उद्धव ठाकरे यांनीही त्यांना कुटुंबप्रमुखाच्या नात्याने आपण झाले गेले विसरून जात असल्याचे सांगतानाच, 'विधानसभेच्यावेळी पुन्हा ही चूक होणार नाही याची खबरदारी घेऊया' असे म्हटले होते. मग जर उद्धव ठाकरे यांनी खानापूर आटपाडीसाठी पै. चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली तर काय ? असा प्रश्न निर्माण होतो.

पण हा विषय केवळ खानापूर आटपाडीत पुरताच मर्यादित राहत नाही. सांगली जिल्ह्याच्या इतर विधानसभा मतदारसंघात जिथे खा. विशाल पाटील यांना काँग्रेसेतर नेत्यांकडून मदत मिळाली तिथे त्यांची भूमिका महत्त्वाचीच नव्हे तर कळीचा मुद्दा ठरणार आहे.