Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीतील सुंदर नगर मधील वारांगणा व मिरजेतील बेघर महिलांनी बांधल्या आयुक्तांना राख्या !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २० ऑगस्ट २०२४
सांगलीच्या सुंदर नगर वेश्या वस्तीमध्ये अनोखा रक्षाबंधन सोहळा सर्वांचे आकर्षण बनला. महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी सुंदर नगर मध्ये येऊन वारांगना बहिणी सोबत रक्षाबंधन साजरे केले. या प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी केले होते. वारांगना महिलांच्या बंधुप्रेमाने आयुक्त शुभम गुप्ता चांगलेच भारावले. 

यावेळी वारांगना महिलांनी आयुक्त शुभम गुप्ता याना राख्या बांधत रक्षाबंधन साजरे केले. या कार्यक्रमास महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, मालमत्ता व्यवस्थापक धनंजय हर्षद, सामाजिक कार्यकर्ते जमीर कुरणे आदी उपस्थित होते. यावेळी महापालिकेकडून सुंदर नगर सर्व पत्री सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच सुंदर नगर परिसराची स्वच्छता बघून आयुक्त शुभम गुप्ता यांनी सर्व महिलांचे अभिनंदन करीत स्वच्छता राखत असल्याबद्दल कौतुक केले. या प्रेरणादायी उपक्रमासाठी सुंदरनगर मधील वारंगा नानी आपल्या दारामध्ये आकर्षक रांगोळी काढल्या होत्या तसेच फुलांचा वर्षाव करीत आयुक्त शुभम गुप्ता यांचे या महिलांनी स्वागत केले.


त्याचप्रमाणे मिरज येथील राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत, चालविण्यात येणाऱ्या आस्था बेघर महिला निवारा केंद्रांमध्ये रक्षाबंधन निमित्त आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

बेघर- निराधार महिलांनी आयुक्त गुप्ता यांना राखी बांधणे व संसार उपयोगी साहित्याचे वाटप असा उपक्रम पार पडला. "बेघर महिलांचे भाऊ आम्ही आहोत! त्यांचे रक्षण करणे हे कर्तव्य आहे, परंतु बहिणीने सक्षम व्हावे! असे आवाहन केले. तसेच बेघर केंद्राने महिलांचे केलेले पुनर्वसन व सक्षमीकरणाचे कौतुक प्रमुख पाहुणे आयुक्त गुप्ता यांनी केले. यावेळी त्यांनी पुनर्वसन, पुनर्विवाह झालेल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्टने संसार उपयोगी साहित्य दिले. 

या कार्यक्रमाचे ज्योती सरवदे यांनी शिस्तबद्ध संयोजन केले. प्रास्ताविक व्यवस्थापक रमजान खलिफा, स्वागत केंद्रप्रमुख सुरेखा शेख यांनी केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र ताटे, डॉ. विनोद परमशेट्टी, इचलकरंजी उपायुक्त स्मृती पाटील, अनिस मुल्ला, गणेश मोरे, अरुण लोंढे, मोहन वाटवे, आयुब इनामदार, प्रमोद माळी, सोहेल शेख, आयुब सुतार उपस्थित होते. आभार प्रकल्प व्यवस्थापक ज्योती सरवदे यांनी मानले.