Sangli Samachar

The Janshakti News

फडणवीसांनी एकाच दगडात किती पक्षी मारले...?




लोकसभा निवडणुकीत महायुतीचा मिशन 45 ला धुळीत मिळवत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात दमदार मुसंडी मारली. 48 पैकी 30 जागा जिंकलेल्या आघाडीचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला. याउलट अनपेक्षित निकालाने महायुतीची दाणादाण उडवली. आधीच दारुण अपयशाच्या खाईत लोटलेल्या महायुतीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक धक्का दिला.

निवडणुकीच्या निकालाचं अपयशाची जबाबदारी उचलत त्यांनी आपल्या मंत्रि‍पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवत मोठा बॉम्ब टाकला. सरकारमधून मला मोकळे करा, अशी विनंती पक्षश्रेष्ठींना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अन् राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले. पण फडणवीसांनी राजीनाम्याचा बॉम्ब टाकत एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने देशासह महाराष्ट्रात पूर्ण ताकद लावली होती. सत्ता हाती असताना साम, दाम, दंड भेद या चतुसुत्रीचा वापर करत मोदी सरकारने विरोधकांना खिळखिळे करण्याची एकही संधी सोडली नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससारखे राज्यातील बलाढ्य पक्ष फोडल्यानंतर फडणवीसांसह भाजप नेत्यांच्या ॲटि्ट्यू़ड चांगलाच बदलला होता.

भाजप नेत्यांनी महाराष्ट्रात 'मिशन 45'पूर्ण करणारच, काहींनी तर महाविकास आघाडीने त्यांचे 18 खासदार निवडून आणले तर राजकीय संन्यास घेणार असल्याचा दावा वारंवार बोलून दाखवला होता. एक्झिट पोलच्या आकड्यांनी तर भाजप नेत्यांच्या आनंदाला आभाळ ठेंगणे झाले होते. तर हतबल झालेली महाविकास आघाडी निकालात काहीतरी चमत्कार घडेल, अशी आशा लावून बसली होती. निकालात महाविकास आघाडीचं नशीब फळफळलं अन् महाराष्ट्राने त्यांच्या पारड्यात चक्क 30 जागा टाकल्या. तर महायुतीला अवघ्या 17 जागांवर गाशा गुंडाळावा लागला. कमीत कमी 30 आणि जास्तीत जास्त 45 जागांचं स्वप्नं भंगलं. एकामागोमाग असे दिग्गजांचे बुरूज ढासळले आणि भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची वाताहत झाली.

देवेंद्र फडणवीस भाजपचा महाराष्ट्रातला प्रमुख चेहरा आहे. जागावाटपापासून ते उमेदवारी देण्यापर्यंत सगळ्यात निर्णयात त्यांचा रोल अतिशय महत्वाचा होता. यशाला बाप नसतो पण अपयशाला अनेक बाप असतात असं म्हणतात तसंच महायुतीच्या बाबतीतही आता हळूहळू घडू लागले होते. शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वपक्ष असलेल्या भाजपमधूनही महायुतीच्या पराभवावर वादाच्या ठिणग्या पडू लागल्या आहेत. त्याआधीच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपला तीर चालवला. दि. 30 जून 2022, एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर भाजप आणि शिंदे गट मिळून सत्तास्थापन करणार हे निश्चित झालं होतं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे ठरलं. पण देवेंद्र फडणवीस यांनी मी सरकार बाहेर असेन, असं जाहीर केलं. फडणवीस सत्तेच्या बाहेर म्हणजे सरकार अस्थिरच हे ओळखून केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांना सरकारमध्ये सामील होण्याच्या सूचना केल्या. फडणवीसांनी पक्षाचा आदेश मान्य करत सरकारमध्ये सामील झाले. दि. 5 जून 2024, लोकसभेच्या निवडणुकीत 23 खासदार असलेला भाजपचे अवघे 9 खासदार विजयी झाले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी पराभवाची जबाबादारी स्वीकारात उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. मात्र, त्यांच्या राजीनाम्याला पक्षातूनच विरोध होतो आहे.

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील भाजपचा चेहरा आहेत. भाजपच्या यशात त्यांचा मोठा वाट आहे. भाजपचे १०५ आमदार निवडून आणण्यात 'देवेंद्र नीती'चा मोठा वाटा होता. काँग्रेस, राष्ट्रवादीतील बलाढ्य नेत्यांना भाजपमध्ये आणून या दोन्ही पक्षाची जनाधर कमी करण्याची देवेंद्र नीती 2014 आणि 2019 मध्ये यशस्वी झाली. मात्र, भाजपला दोन वेळा मोठे यश मिळवून देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी या वेळी अपयशाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याची तयारी दाखवत एका दगडात चार पक्षी मारले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची देणार असल्याचे जाहीर करताच मुख्यमंत्र्यानी अपयशाची जबाबदारी सामुहीक असल्याचे सांगत. फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्र्याकडूनच खुंटा हालवून मजबूत फडणवीस करत आहेत. मोठ्या पक्षाचा मुख्य नेताच सरकार बाहेर असेल तर सरकार अस्थिर राहण्याचा धोका आहे. मुख्यमंत्री शिंदे तो धोका पत्कारणार नाहीत.

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नेतृत्व करत असले तरी जुन्या आणि नवीन नेत्यांना स्वतःचे नेतृत्व प्रस्थापित करायचे आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस स्वत: होवूनच सरकारमधून बाजुला होत असेल तर त्यांच्यासाठी चांगलेच आहे. मात्र, मोहित कंबोज यांनी ट्विट करत या नेत्यांनाच इशारा दिला आहे. त्यामुळे विधानसभा अवघ्याच चार महिन्यांवर असताना फडणवीसांना सरकारमधून बाहेर पडू देणे भाजपला परवडणार नाही. त्यामुळे पक्षांतर्गत विरोधकांना सुद्धा शांतच राहवे लागणार आहे. सरकारमधून बाहेर पडून विधानसभेच्या तयारीवर लक्ष देण्याची फडणवीसांनी इच्छा आहे. त्यामुळे फडणवीसांना स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी देखील करता येऊ शकते. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे ओझे त्यांच्यावर नसेल. जागा वाटपाचाही प्रश्न त्यांच्यासमोर नसेल. निवडणुकीत महाविकास आघाडीला 43.91 टक्के मते मिळाली तर आम्हाला 43.60 मतं आहेत. महाविकास आघाडीपेक्षा अर्धा टक्क्या कमी मतदान आम्हाला आहे. ही आकडेवारी जाहीर करत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना इशाराच दिला आहे. की त्यांची जनधार कमी झालेली नाही. त्यामुळे पक्षसंघटनेत काम करून पुन्हा विधानसभेला विजय मिळवणार असल्याचा उद्देश त्यांच्या राजीनामा अस्त्रात दिसतो आहे.