Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीच्या "जय-वीरू"मुळे काँग्रेसची सेंच्युरी !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ७ जून २०२४
माजी मंत्री व विद्यमान आमदार डॉ. विश्वजीत कदम आणि विद्यमान खासदार विशाल पाटील यांना सध्या सांगलीतील काँग्रेसचे" जय वीरू" म्हणून ओळखले जाते. गत लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना ऐनवेळी स्वाभिमानीची उमेदवारी देऊन "काही शक्तींनी" काँग्रेसचे व विशाल पाटील यांचे पंख छाटण्याचे काम केले होते, त्यात त्यांना यश आले आणि विशाल पाटील यांना अपयशाचे घोट वाचवावे लागले. हा झाला इतिहास, पण याच इतिहासाचा धडा घेऊन तदनंतर विशाल पाटील यांनी डॉ. विश्वजीत कदम यांचे नेतृत्व मान्य केले व डॉ. विश्वजीत कदम यांच्या बरोबरीने आपल्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन सांगली जिल्ह्यात काँग्रेसला पूर्व वैभव प्राप्त करून देण्यासाठी रात्रीचा दिवस केला. इथूनच खऱ्या अर्थाने दोघांची 'जोडी' जमली

केंद्रातील आणि राज्यातील सरकारांचे अपयश व जिल्ह्यातील विकास कामात झालेली पीछेहाट यावर लक्ष केंद्रित केले आणि आगामी लोकसभेची पुनर्बांधणी सुरू केली. काँग्रेस पासून दुरावलेला कार्यकर्ता व मतदार यांना पुन्हा एकसंघ करून जिल्ह्यात मजबूत संघटन तयार केले.



या साऱ्या प्रवासात व विविध कार्यक्रमांमधून डॉ. विश्वजीत कदम यांनी 'विशाल पाटील हेच काँग्रेसचे खासदार म्हणून लोकसभेत जातील.' याचा वारंवार पुनरुच्चार केला. इतकेच नव्हे तर जागा वाटपात विशाल पाटील यांना पर्यायाने सांगली जिल्हा काँग्रेसला "साईडला" टाकले जाते आहे, हे लक्षात आल्यानंतर आपली प्रतिष्ठा पणाला लावली. लोकसभेला विशाल पाटील हे काँग्रेसतर्फे एकमेव उमेदवार असतील. असे जाहीर करून, त्यांच्यासाठी 'गल्ली ते दिल्ली' असा प्रवास केला. विशाल पाटील यांच्यासाठी राज्याच्या व केंद्राच्या नेतृत्वापुढे हट्ट धरला. पण महाआघाडीतील ठाकरेंच्या हट्टापुढे त्याला दोन पाऊले मागे यावे लागले.

पण हार न मानता विशाल पाटील यांच्या बंडखोरीमागे अप्रत्यक्षरित्या ताकद लावली. स्वतः महाआघाडीत कार्यरत राहून पडद्यामागून ज्या 'खेळी' खेळल्या, त्याचमुळे विशाल पाटील हे गुलालात नाऊन निघाले. या विजयाच्या गुलालात रंगण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरने सांगलीत पोहोचले आणि विजयाचा आनंद साजरा केला.

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान डॉ. विश्वजीत कदम यांच्यावर आघाडी धर्माला तिलांजली देण्याचा आरोप झाला. संजय राऊत यांनी तर अक्षरशः आगपाखड केली. पण त्यांना थेट उत्तर न देता, उद्धव ठाकरे यांच्यासमोरच "तुम्ही राज्यातील वाघ असला तरी आम्ही जिल्ह्यातील वाघ आहोत" हे ठाणकावून सांगितले. डॉ. विश्वजीत कदम यांनी केवळ 'डरकाळी'च फोडली नाही तर त्याप्रमाणे आपली 'जिगर'ही दाखवून दिली. विशाल पाटील यांना लाखाहून अधिक मताधिक्य मिळाले यामध्ये डॉ. विश्वजीत कदम यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सर्वांनीच मान्य केले.

राऊत यांनी विशाल पाटील यांच्या पायलटचे विमान भरकटून गुजरातला जाण्याचा आरोप केला होता. या आरोपाला आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी खासदार विशाल पाटील यांना विमानात बसवून थेट दिल्लीला घेऊन गेले. आणि ९९ वर अडलेल्या काँग्रेसला सेंच्युरी मिळवून दिली.