Sangli Samachar

The Janshakti News

अजब रेल्वे स्टेशनच गजब कथा !

| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ७ जून २०२४
रेल्वे स्टेशन अशी बांधली जातात की तिथं गाड्या थांबू शकतील आणि लोक ये-जा करू शकतील. पण, देशात एक असं रेल्वे स्थानक आहे जिथे एकही ट्रेन थांबत नाही. वर्षातून केवळ 15 दिवसच इथं गाड्या थांबतात, अशी परिस्थिती आहे. तेही एका खास प्रसंगी. उर्वरित वेळ हे रेल्वे स्थानक निर्जनच असते. हे केवळ एक-दोन वर्षांपासून नाही, तर 26 वर्षांपासून सुरू आहे आणि या काळात इथं एकही तिकीट विकलं गेलं नाही.

खरं तर, आम्ही बिहारच्या अनुग्रह नारायण रोड घाट रेल्वे स्टेशनबद्दल बोलत आहोत. हे स्थानक बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात मोडणाऱ्या पूर्व-मध्य रेल्वेच्या दीनदयाल उपाध्याय विभागांतर्गत ग्रँड कॉर्ड रेल्वे मार्गावरील मुगलसराय-गया रेल्वे विभागादरम्यान स्थित आहे. हे रेल्वे स्थानक ब्रिटीश राजवटीत बांधण्यात आलं होतं, मात्र गेल्या 26 वर्षांपासून ते ओसाड पडलं असून आता येथील तिकीट काउंटरही बंद पडलं आहे.

इथं गाड्या कधी थांबतात ?

असा प्रश्न तुमच्या मनात असेल की इथून तिकीट मिळत नाही आणि लोक ये-जा करू शकत नाहीत, मग स्टेशन सांभाळण्यात काय अर्थ आहे? त्यामुळे इथं गाड्या वर्षातून 15 दिवस थांबतात हे. दरवर्षी पितृ पक्षाच्या वेळी 15 दिवस इथं ट्रेन थांबतात. याचा अर्थ असा की दरवर्षी पितृ पक्षाच्या काळात लोक येथे 15 दिवस चढ-उतार करू शकतात.

पितृ पक्षाच्या काळात येथे 15 दिवस गाड्या का थांबतात ?

कारण लोक श्राद्धाच्या वेळी त्यांच्या पूर्वजांना प्रार्थना करण्यासाठी जवळच्या पुनपुन नदीवर जातात. हा धार्मिक विधी दरवर्षी पितृ पक्षात केला जातो. लोकांना पुनपुन नदीत श्राद्ध विधी करता यावं यासाठी हे स्थानक अनेक दशकांपूर्वी बांधण्यात आलं होतं.

रेल्वे कर्मचारी वर्षातून काही दिवसच इथे राहतात

आता ना तिकीट मिळतं ना कुठली ट्रेन इथं थांबते, तेव्हा रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तैनातीचा प्रश्नच उद्भवत नाही. पण, पितृ पक्षाच्या काळात 4-5 रेल्वे कर्मचारीही वर्षातून 15 दिवस येथे तैनात असतात. तिकीट मिळत नसल्याने येथून ट्रेनमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे वर्षातून 15 दिवस तात्पुरत्या स्वरूपात तिकीट वाटप करण्याची व्यवस्थाही रेल्वे करते.