Sangli Samachar

The Janshakti News

आवडत्या सुत्राचा फॉर्म्युला आखला अन भाजप फसला ! विधानसभेचे काय गणित असणार ?



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ७ जून २०२४
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'कोणाचे कुठे चुकले आणि महायुतीची गाडी कुठे पंक्चर झाली ?' याबाबतचे चिंतन सुरू झाले आहे. २०१९ च्या निवडणुकीत एकट्या भाजपने जितक्या जागा जिंकल्या होत्या, तितक्या जागा महायुती मिळून जिंकू शकली नाही. यामागे देवेंद्र फडणवीसांचा आवडता 'स्ट्राइक रेटचा फॉर्म्युला' जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी चर्चांचे जे रवंथ सगळे गेले त्यामध्ये सर्वात अधिक वेळ गेला तो याच 'स्ट्राइक रेटच्या मुद्द्यावर' गतवेळच्या निवडणुकीत कोणाचा 'स्ट्राइक रेट' किती होता, त्यानुसार जागा वाटपाचे गणित ठरवावे. हा मुद्दा देवेंद्र फडणवीस यांनी लावून धरला होता. आणि याच मुद्द्यावर महत्त्वाचा वेळ वाया गेला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. 


फडणवीस आणि कंपुने एकसंघ शिवसेना आणि एक संघ राष्ट्रवादीने गत वेळेस लढावलेल्या जागांचा आणि त्यांना मिळालेल्या मतांची विभागणी करून 'फुटलेल्या शिवसेना व राष्ट्रवादीच्या' अपेक्षित जागेबाबत यावेळी कोणाला किती जागा द्यायच्या, यावर काथ्याकुट होत राहिला. याच स्ट्राइक रेट चा आधार घेऊन, भाजपाने शिंदेंच्या काही जागा कापल्या तर काही जागांवर उमेदवार बदलायला लावले. आणि हीच गोष्ट महायुतीत मित्रपक्ष असलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादीबाबत घडली.

जास्त 'स्ट्राइक रेट'चा मुद्दा फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लावून धरला तोच मुद्दा महायुतीसाठी 'फास' बनला. आता आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे आणि पवार यांनी याच 'स्ट्राइक रेट'चा आधार घेत, भाजपला घेरण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभेला तब्बल 28 जागा लढवून केवळ नऊ जागा जिंकणारा भाजपा विधानसभेला किती जागेवर अडून बसू शकतो ? हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.