Sangli Samachar

The Janshakti News

लोकसभा निवडणुकीनंतर मोठा भाऊ बनलेल्या काँग्रेसची विधानसभेसाठी 'नानागिरी' !| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ७ जून २०२४
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत महायुतीला चारी मुंड्याचीत करून महाआघाडीने अनपेक्षित यश प्राप्त केले. यामध्ये सर्वाधिक जागा जिंकून काँग्रेसने 13 जागांवर आपले शिक्कामोर्तब केले. ज्या विशाल पाटील यांना तिकिटासाठी झुंजवले त्यांनाच बरोबर घेण्याची वेळ काँग्रेसवर आली. विशाल पाटील यांच्यामुळेच राज्यात 14 जागांवर तर देशात काँग्रेस सेंच्युरी गाठू शकली. 

पण हाच मुद्दा घेऊन आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी आगामी विधानसभेसाठी 'नानागिरी' सुरू केली आहे. राज्यातील लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी महाआघाडीला 30 जागा मिळालेल्या आहेत. यामध्ये ठाकरे गटाला नऊ तर शरद पवार गटाला आठ जागा मिळालेल्या आहेत. उर्वरित जागांवर काँग्रेसने बाजी मारलेली आहे. राज्यातील सर्वच पक्षांपेक्षा काँग्रेस आघाडीवर आहे. 

हाच मुद्दा घेऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरे गट आणि शरद पवार गट यांना इशारा देताना म्हटले आहे की, "आता लहान भावांनी लहान भावासारखे वागावं !" लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने सर्वच घटक पक्षांचा आदर करून भाजपला रोखण्याची जी रणनीती आखली होती, त्याचा उल्लेख करत पटोले यांनी म्हटले आहे की, काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून देखील लोकसभेत जागा वाटपाच्या वेळी आम्ही कोणताही हट्ट धरला नव्हता. अगदी सांगलीची हक्काच्या जागेवरही आम्ही पाणी सोडले. पण विधानसभेत मित्र पक्षांनी याचा विचार करावा.

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबाबत मतदारांमध्ये सहानुभूतीची लाट होती. पण विधानसभा निवडणुकीतस तीन महिन्याचा कालावधी असल्यामुळे ही लाट तोपर्यंत ओसरलेली असू शकते. हा मुद्दा पटोले यांनी अधोरेखित केलेला आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत कोण किती जागेवर अडून बसणार ? किती जागेवर बंडाळी होणार, यावर विधानसभेत महाआघाडी सत्तेचा सोपान चढणार का ? हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.