Sangli Samachar

The Janshakti News

स्थिर सरकार देण्यासाठी जेडीयु महत्त्वाची भूमिका बजावेल - के. सी. त्यागी !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ७ जून २०२४
भाजपाला सरकार स्थापनेसाठी जितकी मित्र पक्षांची आवश्यकता आहे तितकीच आवश्यकता मित्र पक्षांनाही सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी भाजपची आवश्यकता आहे. त्यामुळे 'तुटेल इतके न ताणण्याची जबाबदारी' दोन्ही बाजूला असणार आहे. याचसाठी 'कोणत्या विषयावर किती ताणायचे ?' हे ठरवून एनडीए मधील महत्त्वाचा घटक ठरणा-या जेडीयु जनता दल (युनायटेड) पक्षाने आपली रणनीती आपल्याचे दिसत आहे.

याचसाठी मागील टर्ममधील भाजपाने 'एक राष्ट्र एक मतदान' आणि 'समान नागरी कायद्याला' पाठिंबा देण्याची भूमिका जेडीयु च्या नेत्यांनी घेतल्याचे दिसते. पण त्याचवेळी अग्निवीर योजनेची पुनर्विचार करण्याबाबत भाजपकडे मागणी करण्यात येणार आहे.


काल राजधानीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बोलावलेल्या बैठकीनंतर जेडीयु पक्षाचे ज्येष्ठ नेते के. सी. त्यागी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधून आपल्या पक्षाची भूमिका मांडली. याबाबत बोलताना त्यागी म्हणाले की, स्थिर सरकार देण्यासाठी जे डी यु महत्त्वाची भूमिका बजावेल. पक्षाच्या रणनीतीबाबत बोलताना ते म्हणाले की, अग्निवीर योजनेमुळे एक मोठा वर्ग नाराज आहे. त्यामुळे या योजनेतील उणीवावर चर्चा होणे गरजेचे आहे.

'एक राष्ट्र एक मतदान' या मुद्द्यावर बोलताना त्यागी म्हणाले की आमचे नेते नितीश कुमार यांनी कायदा आयोगाच्या प्रमुखांना सविस्तर निवेदन दिले आहे. आम्ही या मुद्द्याच्या विरोधात नाही. पण, सर्वच घटक पक्षांशी चर्चा करून यातील त्रुटीबाबत चर्चा करून याबाबतचा निर्णय घ्यायला हवा.

जातीनिहाय जनगणनेवर जोर देत के. सी. त्यागी म्हणाले की, जातीनिहाय जनगणनेला कोणत्याच पक्षाचा विरोध नाही. जातीनिहाय जनगणना ही काळाची गरज आहे. सर्वच पक्षांचे याबाबत एक मत आहे. त्यामुळे इंडिया आघाडी आणि एनडीए यामधील सेतू बनण्याचे काम आमचा पक्ष करेल.

पुढील पाच वर्ष एनडीए सरकार जनतेच्या हिताच्या दृष्टीने योग्य ती पावले टाकत, वाटचाल करेल आणि आपला कार्यकाल पूर्ण करेल हा विश्वास व्यक्त करीत त्यागी यांनी जेडीयू महत्त्वाची भूमिका बजावेल, असे सांगितले.